Microplastics Present in Breast Milk : आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटलं जातं की, नऊ महिने एखाद्या बाळाला पोटात वाढवल्यानंतर त्याला जन्म देताना त्या महिलेचा पुर्नजन्म होतो. आई झाल्यावर तिच्या जबाबदाऱ्याही वाढतात. बाळाला सांभाळणं, त्याला न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक गोष्टी तिला कराव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे, बाळाला दूध पाजणं, म्हणजेच, स्तनपान (Breastfeeding) करणं. आईचं दूध बाळासाठी अमृतासमानचं असतं. आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. संशोधकांच्या एका संशोधनातून हे समोर आलं आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. 


इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक (Microplastics) शोधले आहेत. यासोबतच या दुधाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी, एका 34 वर्षीय आईच्या अनेक चाचण्या घेतल्या. या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळल्याचं शास्त्रज्ञांच्या संशोधनादरम्यान निष्पन्न झालं. अशावेळी संशोधकही चिंतेत पडले आहेत. तसेच, अशा परिस्थितीत स्तनपान करणं योग्य की, अयोग्य यांसारखे अनेक प्रश्न संशोधकांना पडले आहेत. दुसरीकडे पाहिलं तर, आईच्या दुधाचे नवजात बाळाला अनेक फायदे आहेत. त्याच्या आरोग्यासाठी आईच दूध एखाद्या नवसंजीवनी प्रमाणेच आहे. त्यामुळे संशोधकांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.  


आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक सापडले असल्यानं संशोधकांच्या एका गटानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे. स्तनपाना मार्फत नवजात बाळाची भूक भागते. आईच्या दूधातून त्याला अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे, तज्ञांनी माहिती दिली की, ज्या आईच्या दूधावर बाळ सुरुवातीचे काही महिने अन्नासाठी अवलंबून असतं, त्याच आईच्या दूधात मायक्रोप्लास्टिक आढळून आल्यानं नवजात बाळांच्या आरोग्याबद्दल शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.  


पॉलिमर्स जर्नलमध्ये (Polymers Journal) प्रकाशित झालेल्या स्तन आणि दुधाच्या संशोधनात पॉलीथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनपासून बनविलेले मायक्रोप्लास्टिक्स आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.


संशोधनासाठी, रोम, इटलीमध्ये जन्म दिल्यानंतर एका आठवड्यानंतर 34 निरोगी मातांकडून दुधाचे नमुने घेण्यात आले. त्यातील 75 टक्के दूधाच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले. द गार्डियनच्या (The Guardian) अहवालात म्हटलं आहे की, "मागील संशोधनात मानवी पेशी, प्रयोगशाळेतील प्राणी आणि सागरी वन्यजीवांवर मायक्रोप्लास्टिक्सचे विषारी परिणाम दिसून आले आहेत. परंतु, मानवांवर होणारा परिणाम अद्याप अज्ञात आहे. प्लॅस्टिकमध्ये अनेकदा phthalates सारखी हानिकारक रसायनं असतात, जी आता आईच्या दुधात आढळून आली आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर असून अत्यंत चिंताजनक आहे."


संशोधकांनी सांगितलं की, गरोदर असताना महिला प्लास्टिकमध्ये पॅक करण्यात आलेले पदार्थ, पेय आणि सीफूड्सचं (Seafood) यांचं सेवन करतात. त्यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेसाठी प्लास्टिकयुक्त उत्पादनांचा वापर करतात. याचा मायक्रोप्लास्टिकच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नाही. पुढे बोलताना संशोधकांनी सांगितलं की, हे मायक्रोप्लास्टिकच्या सर्वव्यापी उपस्थितीकडे निर्देश करतं. 


2020 मध्ये इटलीमधील टीमनं मानवी प्लेसेंटामध्ये मायक्रोप्लास्टिक्स शोधलं. "आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक्सच्या उपस्थितीचे पुरावे अर्भकांच्या असुरक्षितेबाबत मोठी चिंता वाढवतात", असं इटलीतील अँकोना येथील युनिव्हर्सिटी पॉलिटेक्निका डेले मार्चे येथील डॉ. व्हॅलेंटीना नोटरस्टेफानो यांनी सांगितलं आहे.


ते पुढे म्हणाले, "गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करण्याच्या काळात या दूषित घटकांचा संपर्क कमी करण्याच्या मार्गांचं मूल्यांकन करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, स्तनपानाचे फायदे प्रदूषणकारी मायक्रोप्लास्टिक्सच्या उपस्थितीमुळे होणाऱ्या हानींपेक्षा कितीतरी जास्त आहेत, यावर जोर दिला पाहिजे. " तसेच, संशोधनात असंही दिसून आलं आहे की, ज्या बाळांना बाटलीनं दूध दिलं जातं, ते एका दिवसांत लाखो मायक्रोप्लास्टिक्स गिळण्याची शक्यता असते.