Pregnancy Trimesters : मातृत्वाचा अनुभव अतुलनीय असतो. पहिली चुकलेली पाळी किंवा पहिली पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट, पहिली तपासणी करवून घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ञाकडे जाण्याचा प्रसंग हे सर्व या आयुष्य बदलवून टाकणाऱ्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे असतात. प्रवास आणि जिथे पोहोचायचे आहे ते ठिकाण या दोन्ही गोष्टी ज्यामध्ये समसमान आनंद मिळवून देतात अशी अवस्था म्हणजे गर्भारपण. हे नऊ महिने यशस्वीपणे पूर्ण व्हावेत यासाठी आधीपासून सज्ज राहिल्यास हा प्रवास अधिक जास्त आनंददायी बनतो आणि कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होणार नाही याची नीट काळजी घेता येते. खार येथील हिंदुजा हॉस्पिटलचे गायनॅकॉलॉजिस्ट डॉ किरण कोएलो यांनी गरोदरपणाच्या 3 तिमाईचा प्रवासाची माहिती दिली...लक्षणे, शारीरिक बदल अन् आहार काय घ्यावा... याबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.
मातृत्वासाठी नियोजन करत असलेल्या आणि गर्भवती महिलांनी काही बाबींची नीट माहिती करवून घेणे अत्यावश्यक आहे, गर्भारपणाचा कालावधी, प्रत्येक तिमाहीचे वेगळेपण, प्रत्येक तिमाहीमध्ये शरीरात होणारे बदल आणि गर्भारपणात शरीराची पोषण पातळी योग्य राखली जाण्यासाठी आवश्यक आहार यांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे.
गर्भारपणाचा कालावधी 38 ते 40 आठवड्यांचा असतो आणि तो तीन तिमाहींमध्ये विभागला जातो.
पहिली तिमाही -
सर्वसामान्यपणे पहिल्या तिमाहीचा काळ खूप सुखाचा असतो, 'आनंदाची बातमी' साजरी करणे हा या तिमाहीतील मोठा सोहळा असतो. या काळात शारीरिक व हार्मोनल बदलांची चाहूल लागलेली असते. गर्भारपणाच्या आधी येऊन गेलेल्या सर्वात शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून पहिल्या तिमाहीची सुरुवात होते. अनेक जणींना या काळात 'मॉर्निंग सिकनेस' म्हणजे, मळमळणे, उलट्या होणे, पोटफुगी, भूक कमी होणे असे त्रास होतात. पण महिलांना हे माहिती असले पाहिजे की असे त्रास होणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. अशावेळी कोणते खाद्यपदार्थ खाल्ल्यावर आपल्याला त्रास होत नाही हे समजून घेतले पाहिजे, तसेच सुके खाणे खाल्ल्याने मळमळ, उलट्या हे त्रास थोपवले जाऊ शकतात. पोटात वाढत असलेल्या गर्भासाठी आणि मातेसाठी देखील पहिली तिमाही अतिशय महत्त्वाची असते कारण या काळात गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. या काळात जन्मपूर्व तसेच संपूर्ण तपासण्या करवून घेण्याचा आणि संतुलित आहारासाठी आहारतज्ञांची मदत घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
गर्भवती महिलांनी पहिल्या तिमाहीमध्ये खूप काळजी घेतली पाहिजे. त्यांचा प्रत्येक आहार संतुलित असणे आवश्यक आहे. चालणे व श्वासाचे व्यायाम यासारखे हलके व्यायाम देखील या कालावधीत सुरु केले पाहिजेत. गर्भवती राहण्याच्या आधीपासून आणि खास करून पहिल्या तिमाहीमध्ये फॉलीक ऍसिडचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फॉलीक ऍसिड आणि इतर पोषकांचे सेवन किती प्रमाणात करावे याबाबतची माहिती डॉक्टर जन्मपूर्व तपासण्या करताना देतात. अल्कोहोल, ड्रग्स आणि तंबाखू सेवन यासारख्या सवयी असल्यास त्या पहिल्या तिमाहीपासूनच बंद कराव्यात जेणेकरून गर्भारपणामध्ये काही गुंतागुंत उद्भवणार नाही.
दुसरी तिमाही -
तेराव्या आठवड्यापासून सत्ताविसाव्या आठवड्यापर्यंतचा काळ म्हणजे गर्भारपणाची दुसरी तिमाही. पोटामध्ये वाढत असलेल्या छोट्या जीवाला आई एव्हाना चांगलीच सरावलेली असते, त्यामुळे हा काळ दोघांच्याही दृष्टीने तसा आरामाचा असतो. पोटामध्ये जाणवलेली बाळाची पहिली ढुशी, सोनोग्राफीमध्ये दिसलेली पहिली आकृती, चिमुकले पाय, पावले असे अनेक संस्मरणीय क्षण या काळात निर्माण होतात.
काही मोठे विकार नाहीत याची खात्री करवून घेण्यासाठी गर्भवती महिला व गर्भ यांची तपासणी करवून घेण्याचा हा काळ, तसेच या कालावधीत आहारामध्ये वाढ करणे, काही मोठे व्यायाम सुरु करणे देखील महत्त्वाचे असते. जो ऋतू सुरु असेल त्या ऋतूतील फळे भरपूर प्रमाणात खाणे, संतुलित आहार घेणे यामुळे आई व बाळ दोघांनाही खूप फायदे मिळतात. आईच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे यासाठी लोह व कॅल्शियम सप्लिमेंट्स देखील घेण्यास सुरु करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
या तिमाहीमध्ये गर्भवती महिलेच्या स्तनांचा आकार वाढू शकतो, तसेच गर्भाचे वजन वाढत असल्याने पाठीच्या दुखण्याची सुरुवात देखील या काळात होऊ शकते. दुसऱ्या तिमाहीमध्ये डॉक्टर्स जेस्टेशनल डायबिटीसची (गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची अवस्था) तपासणी करतात. या तपासणीचे परिणाम पॉझिटिव्ह आढळल्यास डॉक्टर आहारामध्ये काही विशिष्ट बदल करण्याचा तसेच काही औषधे घेण्याचा सल्ला देतील.
जेस्टेशनल डायबिटीसची तपासणी करण्याबरोबरीनेच अल्ट्रासोनोग्राफी, ऍनोमली स्कॅन आणि लघवीचे विश्लेषण यासारख्या तपासण्या देखील करून घेण्यास सांगतात. गर्भवती महिला व तिचे होणारे बाळ दोघेही निरोगी आहेत याची खात्री करून घेण्यासाठी या तपासण्या आवश्यक असतात.
तिसरी तिमाही -
संपूर्ण गर्भारपणातील उपांत्य तिमाही आता सुरु होते. या तिमाहीमध्ये गर्भवती महिलेला तिची तब्येत कशी आहे त्यानुसार दर पंधरा दिवसांनी किंवा दर आठवड्याला तपासणीसाठी डॉक्टरांकडे येण्यास सांगितले जाते.
शेवटच्या तिमाहीमध्ये बाळाचे वजन वाढलेले असते आणि त्याचा पुरेपूर अनुभव आईला मिळत असतो. पण बहुतांश महिलांसाठी गर्भारपणाचे शेवटचे तीन महिने खूप कठीण जातात, बाळाच्या वाढलेल्या वजनामुळे नेहमीच्या हालचाली करणे काहीसे अवघड होऊन बसते, पाठीचे दुखणे वाढते, मूड सतत बदलत राहतो आणि हार्मोनल बदल होत राहतात. तिसऱ्या तिमाहीमध्ये गर्भवती महिलेला काहीसा थकवा जाणवू शकतो, याच काळात खोट्या प्रसवकळा येण्याची देखील शक्यता असते. बाळाची स्थिती, वजन इत्यादी जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी केली जाते तसेच प्रसव नियोजन समजून घेण्यासाठी एक अंतर्गत परीक्षण देखील केले जाते.
या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी जन्मपूर्व काळजी घेतली पाहिजे, यामध्ये एनएसटी टेस्टिंग, अल्ट्रासाउंड स्कॅन, रक्ताची तपासणी तसेच बालरोगतज्ञ व आहारतज्ञ यांच्यासोबत सल्लामसलत यांचा समावेश असतो. गर्भवती महिलेच्या योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असल्यास तिने तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. एकूण गर्भारपण आणि प्रसूतीमध्ये सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडण्यासाठी निरोगी आहार व चांगला व्यायाम यांचा सुयोग्य मिलाप गर्भवती महिलेच्या जीवनशैलीमध्ये असला पाहिजे. गर्भारपणामध्ये महिलेने आपल्या स्त्रीरोगतज्ञांसोबत तसेच आपल्या सहचरासोबत सतत संवाद सुरु ठेवला पाहिजे, मातृत्वाच्या या अतुलनीय साहसामध्ये त्यांची पुरेपूर साथ मिळत राहणे अत्यंत आवश्यक असते. आई व बाळ या दोघांनीही पूर्णपणे निरोगी असणे म्हणजे हा अद्भुत प्रवास सफल झाला असे आपण म्हणू शकतो.