Obesity and Menstruation : लठ्ठपणा (Obesity) असणाऱ्या महिलांना मासिक पाळीत (Menstrual Cycle) जास्त रक्तस्त्राव, कमी रक्तस्राव किंवा अनियमित मासिक पाळी यासारख्या समस्या येतात. मासिक पाळीवर लठ्ठपणाचा परिणाम कसा होतो हे या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. मुंबईतील बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.


प्रजनन आरोग्यावर लठ्ठपणाचा प्रभाव खूपच गंभीररित्या होत असल्याचे दिसून येत आहे. लठ्ठपणा मासिक पाळीची अनियमितता यांचा परस्पर संबंध असून हा सामान्यतः अॅनोव्ह्युलेटरी सायकलचा परिणाम असतो. या अनियमिततेमध्ये मासिक पाळी पूर्ण थांबणे, मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येणे किंवा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त किंवा हलका असू शकतो. लठ्ठपणा असलेल्या स्त्रिया इन्सुलिन प्रतिरोधक असतात ज्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पीसीओएसच्या विकासाला प्रोत्साहन मिळते आणि त्याउलट पीसीओएस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशय मोठे होतात आणि त्यात अनेक लहान द्रव्यांचे संकलन होते. ल्युटीनायझिंग हार्मोन, लेप्टिन, इन्सुलिन, इस्ट्रोन, ट्रायग्लिसराइड्स आणि अत्यंत कमी घनतेच्या लिपो-प्रोटीन्ससारख्या अनेक संप्रेरकांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे हायपो पिट्यूटरी गोनाडो ट्रॅफिकवर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
 
विविध अभ्यासांनी असे दिसून आले आहे की मासिक पाळीत जास्त रक्तप्रवाह होणे याचा लठ्ठपणाशी संबंध असू शकतो. हे गर्भाशयाच्या अस्तराच्या कमी अधिक वाढीमुळे देखील होऊ शकते. मासिक पाळीत जास्त रक्तस्राव म्हणजे प्रत्येक चक्रात 80 मिलीपेक्षा जास्त रक्त कमी होणे किंवा जेव्हा मासिक पाळी एकाच वेळी सात दिवसांपेक्षा जास्त असते. जर तुम्हाला दर 2 तासांनी सॅनिटरी पॅड बदलण्याची गरज असेल, तुमच्या कपड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल किंवा 2.5 सेमीपेक्षा जास्त आकाराच्या गुठळ्या जात असतील, तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञ यांना भेटणे आवश्यक आहे.


कमी किंवा जास्त वजनामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. ओव्हुलेशन हार्मोनच्या पातळीतील बदलांमुळे होते आणि मासिक पाळी पुढील हार्मोनल बदलांमुळे होते. या संबंधात व्यत्यय आणणारी कोणतीही गोष्ट शरीराला ओव्हुलेशन होण्यापासून रोखू शकते. ओव्हुलेशन न झाल्यास तुमची मासिक पाळी चुकते.


वजन आणि शरीरातील फॅट्सचे प्रमाण हार्मोनच्या पातळीवर परिणाम करते. तुमचे वजन कमी असल्यास किंवा शरीरातील चरबी कमी असल्यास मासिक पाळी चुकु शकते. जास्त चरबीमुळे देखील मासिक पाळी चुकू शकते किंवा अतिस्राव होऊ शकतो. वजनात जलद बदल मासिक पाळीत व्यत्यय आणू शकतात. तुमचे वजन कमी किंवा जास्त असल्यास आणि मासिक पाळीच्या समस्या असल्यास, तुम्ही तुमचे वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा विचार नक्कीच केला पाहिजे.


लठ्ठपणाचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असते. गर्भधारणेनंतर, त्यांच्या जास्त वजनामुळे त्यांना गर्भावस्थेतील मधुमेह (रक्तातील जास्त साखर) आणि प्रीक्लेम्पसिया (गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब) होण्याची शक्यता असते. लठ्ठपणामुळे गर्भपात, जन्म विकृती आणि अकाली जन्म होण्याची शक्यता वाढते. सिझेरियन प्रसुती होण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणा होण्यापूर्वी तुमच्या एकूण वजनाच्या ५ टक्के कमी केल्यानेही यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.


वजन कमी केल्याने लठ्ठ महिलांच्या मासिक पाळीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. वजन कमी केल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास मदत होते आणि पीसीओडीमध्ये सुधारणा देखील होते. जीवनशैलीतील बदल करणे गरजेचे ठरते. रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या संतुलित आहार घेणे आणि व्यायामाची जोड असणे आवश्यक ठरते. वजन कमी झाल्याने प्रजनन प्रणाली देखील सुधारतात. मासिक पाळीचे चक्र नियमित होत जाते आणि अॅनोव्ह्युलेटरी झालेले हे चक्र पुन्हा ओव्हुलेटरी बनते. पीसीओडीने ग्रस्त असलेल्या महिलांनी यावर उपचार घेण्यासाठी एंडोक्राइनोलॉजिस्टला देखील भेट देणे आवश्यक आहे. गंभीर लठ्ठपणा असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत (बीएमआय 37.5 kg/m2 पेक्षा जास्त), वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेची शिफारस केली जाऊ शकते.


मासिक पाळीच्या आरोग्यावर वजनाचा मोठा परिणाम होतो. कमी वजन आणि जास्त वजन असण्यामुळे मासिक पाळीवर नकारात्मक परिणाम होतो आणि पुढील समस्या जसे की पीसीओएस, प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेदरम्यान समस्या उद्भवू शकतात. वजन कमी केल्याने जास्त वजन आणि बीएमआय असलेल्या महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. निरोगी आहार आणि जीवनशैली हा थेरपीचा मुख्य आधार आहे, तथापि अधिक गंभीर लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी आणखी मदतीची आवश्यकता असू शकते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लठ्ठपणा असलेल्या महिलांना वजन कमी करण्याच्या औषधांचा किंवा फुगा घालण्यासारख्या एंडोस्कोपिक उपचारांचा फायदा होऊ शकतो. अतिलठ्ठ रुग्णांना बॅरिअॅट्रिक/मेटाबॉलिक शस्त्रक्रियेचा फायदा होऊ शकतो. जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही पारंपारिक उपायांनी ते कमी करु शकत नसाल तर पुढील मार्गदर्शनासाठी तज्ञांना नक्की भेट द्या.


डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, सैफी, अपोलो स्पेक्ट्रा, नमाहा आणि क्युरे हॉस्पिटल्स, मुंबई


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.