Women Safety Travel : भारतीय रेल्वेचा (Indian Railway) प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि आरामदायी समजला जातो. हे देशातील एक असे माध्यम आहे, ज्यातून दररोज लाखो स्त्री-पुरुष प्रवास करतात. महिला जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषत: जेव्हा ती एकटी प्रवास करते, तेव्हा तिच्या सुरक्षेची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा विचार करून भारतीय रेल्वेने 'मेरी सहेली' मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 'मेरी सहेली' मोहिमेबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हीही सुरक्षित प्रवास करू शकाल. जाणून घ्या...



मेरी सहेली मोहीम काय आहे?


महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी उत्कृष्ट मोहीम आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला या मोहिमेचा फायदा होत आहे. विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही मोहीम सर्वोत्तम मानली गेली आहे. जेव्हा महिला ट्रेनमध्ये एकट्या प्रवास करतात, तेव्हा दररोज त्यांच्यासोबत छेडछाड किंवा अतिप्रसंगाच्या घटना घडत असल्याचं आपण नेहमी ऐकतो. महिलांबाबत अशा घटना घडू नयेत, यासाठी भारतीय रेल्वे मेरी सहेली मोहिमेअंतर्गत सुरक्षा पुरवत असून महिलांवरही लक्ष ठेवण्यात येते.



महिला प्रवाशांना कसा फायदा होईल?


मेरी सहेली मोहिमेअंतर्गत महिला प्रवाशांना अनेक फायदे मिळतात. मेरी सहेली अभियानाच्या टीममध्ये फक्त महिलाच असतात. या टीमच्या माध्यमातून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) टीम महिला प्रवाशांमध्ये जागृती करते आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकडून माहिती गोळा करते. मेरी सहेली मोहिमेअंतर्गत टीम एकट्या प्रवास करणाऱ्या महिलेला विचारू शकते, तुम्ही कुठे जात आहात? प्रवासात काही अडचण आहे का? प्रवासादरम्यान कोणी तुम्हाला फ्लर्ट करत आहे किंवा छेडत आहे का?



महिलांनो... 182 क्रमांक लक्षात असू द्या


रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मेरी सहेली टीम एकट्या प्रवास करणाऱ्या महिलेला सुरक्षा तर देतेच, पण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी टिप्सही देते. जर एखाद्या महिला प्रवाशाला ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आली, तर ती रेल्वे सुरक्षा दलाच्या 182 क्रमांकावर कॉल करून माहिती देऊ शकते. यासोबत आरपीएफची टीम महिलेच्या सुरक्षेसाठी उपस्थित असते.



या मार्गांवर तुम्ही मोहिमेचा लाभ घेऊ शकता


रेल्वेच्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेमध्ये धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये ही उत्कृष्ट मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मुंबई सेंट्रल – जयपूर आणि वांद्रे टर्मिनस – अमृतसर या गाड्यांवर पाहता येईल. याशिवाय बिहारमधील अनेक मार्गांवर महिलाही या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात.


 


 


हेही वाचा>>>


Women Safety Travel : काय सांगता..महिलांना विना तिकीट रेल्वेने प्रवास करणं शक्य आहे? काय आहे नियम? जाणून घ्या..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )