Women Health : साडी म्हटलं की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय.. लग्न समारंभ, हळदी कूंकू, कौटुंबिक कार्यक्रम, मंदिरात जाणं, सांस्कृतिक कार्यक्रम, निमित्त काहीही असो.. प्रत्येक प्रसंगी साडी नेसणं म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. तर साडी हा केवळ पेहराव नसून तो भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अशात महिलांमध्ये साडीबद्दल एक वेगळीच ओढ पाहायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत याबाबत काही धक्कादायक बातम्या ऐकायला मिळत आहेत. वाचायला थोडं कठीण वाटेल पण हे खरंय.. आपण साडीमुळे होणाऱ्या कॅन्सरबद्दल बोलत आहोत...


 


महिलांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे


कॅन्सरचे नाव ऐकताच लोक घाबरतात, पण याबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि आमचा लेख याच दिशेने एक छोटासा प्रयत्न आहे. या लेखात आम्ही आमच्या वाचकांना या जीवघेण्या समस्येबद्दल साडी कॅन्सर म्हणजेच साडीचा कर्करोग याबद्दल योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. एका खासगी वेबसाईटच्या वृत्तानुसार त्वचा आणि केस विशेषज्ञ डॉ. विप्लव कांबळे यांनी याबाबत माहिती दिलीय. जी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.


 


साडीचा कर्करोग म्हणजे काय?


डॉ. विप्लव कांबळे सांगतात की, साडीचा कर्करोग हा त्वचेचा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो सतत चुकीच्या पद्धतीने साडी नेसल्याने होऊ शकतो. वैद्यकीय जगतात याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणून ओळखले जाते. स्क्वॅमस पेशी एपिडर्मिसच्या मुख्य संरचनात्मक पेशी आहेत, म्हणजे त्वचेचा बाह्य थर, ज्यांचे नुकसान त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवते.


 


साडी कॅन्सर का होतो?


साडी नेसल्याने कॅन्सर कसा होऊ शकतो? यावर प्रतिक्रिया देताना डॉ.विप्लव कांबळे सांगतात की, साडीला सतत त्याच जागी बांधल्याने किंवा पेटीकोटमुळे बेंबीला दाब दिल्याने कंबरेवर जखमा तयार होतात. या जखमांवर वेळीच उपचार न केल्यास त्यांचे रूपांतर त्वचेच्या कर्करोगात होते.


देशातील अनेक भागात महिला वर्षभर साडी घालतात, मग तो उन्हाळा असो किंवा पावसाळा. अशा स्थितीत, स्त्रिया बऱ्याचदा देखभालीची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत आणि यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. विशेषत: टेरी कॉट किंवा सिंथेटिक कापडांनी बनवलेल्या साड्या नेसल्याने त्वचेच्या अशा समस्या उद्भवतात. यासोबतच काही स्त्रिया छान दिसण्यासाठी अतिशय फिट साड्या घालतात, त्यामुळे त्वचेवर खुणा आणि जखमा निर्माण होतात.


 


केवळ साडीच नाही तर, घट्ट जीन्स, इतर कपडे देखील कारणीभूत


केवळ साडीच नाही तर घट्ट जीन्स आणि इतर कपडे देखील त्वचेच्या कर्करोगाचा धोका निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, काश्मीरमध्ये थंडीच्या दिवसात कांगरी कपड्यांखाली ठेवल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. दिसल्यास, कोणत्याही प्रकारचे बाह्य अतिक्रमण किंवा त्वचेवर दाब पडल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.


 


साडीचा कर्करोग कसा टाळता येईल?


साडीचा कॅन्सर टाळण्यासाठी कधीही साडीला जास्त घट्ट बांधू नये, तर तुमची सोय लक्षात घेऊन साडी बांधण्याचा प्रयत्न करा.


कॉटनचा पेटीकोट बांधल्याने तुमच्या कंबरेवर ठसा उमटला तर तुम्ही स्कर्ट किंवा इतर प्रकारचा पेटीकोट घालू शकता. त्याच वेळी, पेटीकोटला बांधलेल्या दोरीची काळजी घ्या जेणेकरून कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही.


तसेच साडीच्या फॅब्रिकची काळजी घ्या, टेरी कॉट किंवा सिंथेटिक फॅब्रिक्सच्या साड्या जास्त वेळ घालू नका. कॉटन आणि सिल्कच्या साड्या सोयी आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात.


साडी बांधल्यामुळे कंबरेवर जखमा होत असतील तर तत्काळ त्वचा तज्ज्ञांशी संपर्क साधा. त्वचा तज्ज्ञ तपासणीच्या आधारे समस्येचे गांभीर्य समजू शकतील.


उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कंबरेवर किंवा त्वचेच्या इतर कोणत्याही भागावर त्वचेवरील पुरळ हलक्यात घेऊ नका. 


संरक्षणासाठी, त्वचेची स्वच्छता आणि देखभाल पूर्ण काळजी घ्या.


या सावधगिरींसोबतच कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी तुमचा आहार आणि जीवनशैली संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. 


संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करा, आणि तुमची दिनचर्या नियमित ठेवा.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Women Health : भविष्यात आई बनण्यासाठी आत्ताच 'एग फ्रीझिंग' करायचंय? तज्ज्ञ काय सांगतात? ते जाणून घ्या