What Is Species Dysphoria: एखादं लहान मूल (Small Child) शाळेत जातं, त्यावेळी त्याला सर्वांसमोर स्वतःची ओळख करुन देण्यास सांगितलं जातं. सर्व मुलं आपली ओळख सांगतात. पण जरा विचार करा की, असंच एखादं लहान मूल आपली ओळख करुन देण्यासाठी संपूर्ण वर्गासमोर उभं राहिलं आणि त्यानं सांगितलं की, तो लांडगा (Wolf) आहे, तर...? त्या मुलावर संपूर्ण वर्ग हसू लागेल, हे तर उघड आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण, आम्ही तुम्हाला सांगतो की, यात हसण्यासारखं काहीच नाही. 


संपूर्ण वर्गासमोर स्वतःला लांडगा म्हणून घेणारा लहान मुलगा कदाचित स्पीशीज डिस्फोरियानं (Species Dysphoria) ग्रासलेला असू शकतो. नुकतंच ब्रिटनमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जाणून घेऊयात त्याबाबत सविस्तर... 


ब्रिटनचं प्रकरण नेमकं काय? 


डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिकडेच एका ब्रिटीश शाळेतील मुलानं स्वतः लांडगा असल्याचं संपूर्ण वर्गासमोर सांगितलं. त्या मुलानं सांगितलं की, तो लांडगा आहे आणि त्याला त्याच्या याच ओळखीसोबत शाळेत शिकायचं आणि वावरायचं आहे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शाळेनं यासाठी मुलाला परवानगी दिली आहे. खरं तर, शाळेला स्पीशीज डिस्फोरियाबाबत माहिती आहे. त्यामुळेच शाळेनं मुलाला तो माणूस नाहीतर लांडगा आहे, या ओळखीसह वावरण्यास परवानगी दिली आहे. 


मात्र, ब्रिटनमध्ये घडलेली ही पहिलीच वेळ नाही. ब्रिटनमध्ये अशा अनेक शाळा आहेत, जिथे मुलं विविध प्राण्यांचं व्यक्तिमत्त्व स्विकारतात आणि तेच स्वक्तिमत्त्व अंगीकारुन शिक्षण घेतात. याचाच अर्थ या शाळांमधील काही मुलं स्वतःला साप, पक्षी, ड्रॅगन, कोल्हा आणि अगदी डायनासोर समजतात. 


स्पीशीज डिसफोरिया म्हणजे नेमकं काय?


स्पीशीज डिसफोरिया ही एक मनोवैज्ञानिक स्थिती आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःला त्याच्या शारीरिक ओळखीपेक्षा वेगळी प्रजाती म्हणून समजते. हे सामान्यतः लिंग डिसफोरियासारखंच समजलं जाऊ शकतं, ज्यामध्ये एखादा व्यक्ती त्याच्या जन्माच्या लिंगापेक्षा एका वेगळ्याच लिंगासह समाजात वावरतो. दरम्यान, स्पीशीज डिसफोरियामध्ये, व्यक्ती स्वत: ला माणूस म्हणून न मानता प्राणी, पक्षी किंवा इतर काहीतरी समजतो आणि त्याच ओळखीनं समाजात वावरतो.


स्पीशीज डिसफोरियामध्ये व्यक्तीला नेमकं काय वाटतं?


स्पीशीज डिसफोरियानं ग्रस्त लोक स्वतःमध्ये खोल मानसिक आणि भावनिक असंतुलन अनुभवतात, ज्याचा त्यांच्या वागणुकीवर, जीवनशैलीवर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. या स्थितीमुळे संबंधित व्यक्तींना वाटतं की, त्यांची शारीरिक ओळख आणि त्यांच्या आंतरिक भावना जुळत नाहीत. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीला स्पीशीज डिसफोरियाचा त्रास होत असेल, तर तो स्वत:ला लांडगा, मांजर, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्राण्यासारखा समजू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या विचारांवर, स्वप्नांवर आणि इच्छांवरही या अनुभवाचा परिणाम होऊ शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Funeral Rituals: अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरही 'हा' अवयव जळत नाही; यामागील कारण काय?