Neocov Virus Variant : ओमयक्रोन व्हेरियंटचा सामना करत असताना जगावर आणखी एका कोरोना व्हेरियंटचं संकट समोर आले आहे.  चीन संशोधकांनी निओकोव्ह (Neocov) नावाचा नवा कोरोना विषाणू संदर्भातील माहिती एका रिसर्चमध्ये समोर आणली आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघुळमध्ये आढळत असल्याचं म्हणणं आहे. हा मानवी शरीरात शिरकाव करू शकतो का? हा मानवासाठी किती घातक आहे ? याचा नुसता बागुलबुवा केला जातोय का ? पाहुया त्या संदर्भात तज्ज्ञ काय म्हणतात...


डेल्टा, डेल्टा प्लस, ओमायक्रोन आणि आता कोरोनाच्या नव्या विषाणू निओकोव्हची चर्चा सुरू झाली आहे. चीन संशोधकांनी जो रिसर्च समोर मांडला आहे, त्यामध्ये अशाप्रकारचा कोरोना विषाणू वटवाघुळमध्ये आढळत असून तो मानवी शरीरात शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्याचा संसर्ग सुद्धा झपाट्याने होऊ शकतो, असं या रिसर्च मध्ये म्हटलं आहे. मात्र, खरंच याची भीती बाळगण्याची गरज आहे का? की नुसता बागुलबुवा केला जातोय, याबाबत डॉक्टरांचं म्हणणं काय आहे.


हा विषाणू मानवासाठी खरच घातक ठरणार का ? याबाबत रशियातील वृत्तसंस्था ‘तास’ नुसार डब्ल्यूएचओने, आम्हाला वुहानच्या शास्त्रज्ञांच्या नवीन शोधाची माहिती असल्याचं सांगितलं असून हा प्रकार मानवांवर परिणाम करेल की नाही? त्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे, असे म्हटले आहे. 


ज्या निओकोव्ह विषाणूची चर्चा होतीये, पण हा निओकोव्ह विषाणू नवीन नाही. हा विषाणू MERS-CoV विषाणूशी संबंधित आहे. २०१२ मध्ये हा विषाणू मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडला आहे. हा SARS Cove 2 सारखाच आहे, ज्यामुळे करोना विषाणू मानवांमध्ये पसरला होता. हा विषाणू वटवाघुळांमधल्या ACE 2 नावाच्या रिसेप्टर प्रोटीनद्वारे पसरतो. याचे म्युटेशन झाले तर विषाणू मानसांमध्ये पसरू शकतो. मात्र सध्यातरी अशा प्रकारची म्युटेशन होण्याची शक्यता ही खूपच कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.



ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग अजूनही कमी झालेला नसताना चिनी शास्त्रज्ञांकडून अशा प्रकारच्या नव्या कोरोना विषाणूची माहिती समोर आणली जाते. मात्र यावर जोपर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांकडून अभ्यास होत नाही आणि त्याच्या म्युटेशन परिणामांबाबत तज्ञांकडून स्पष्टता येत नाही. तोपर्यंत अशा विषाणूंच्या चर्चांना घाबरण्याचं कारण नाही, असंच तज्ञांचे म्हणणे आहे.