Weight Loss : आजकाल मोबाईल आणि इंटरनेटच्या (Internet) युगात माणसाचे शारिरीक कष्ट कमी झालेत. बिझी लाईफमध्ये अनेकांना रोज व्यायाम करायला वेळ मिळत नाही. पण तरीदेखील अगदी स्लिम-ट्रिम राहण्याची अपेक्षा बाळगली जाते. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण नुकतीच एका संशोधनातून नवीन माहिती समोर आलीय. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की त्यांचे हे अशा प्रकारचे पहिले संशोधन आहे. ज्यामध्ये शारीरिक हालचालींचे नमुने आणि फॅट टिश्यू यांच्यातील संबंध दर्शविला गेला आहे.


 


वैज्ञानिक म्हणतात, 'असा' व्यायाम करा की..


वजन कमी करण्यासाठी आहार नियंत्रणासोबतच नियमित व्यायाम महत्त्वाचा असला तरी, ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असं म्हटलंय की, आठवड्यातून फक्त एक किंवा दोनदा व्यायाम करूनही तुम्ही वजन कमी करू शकता. रिसर्चमध्ये असे म्हटलंय की, जर तुम्ही वीकेंडला हायस्पीड व्यायाम केला तर तुम्हाला वजन कमी करण्यामध्येही तेवढाच फायदा मिळेल, जो तुम्ही रोजचा व्यायाम करता. संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीचाही हवाला दिलाय, ज्यात त्यांनी म्हटलंय, लोकांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटे हलका व्यायाम करावा. जर तुम्ही आठवड्यातून 75 मिनिटे उच्च तीव्रतेच्या शारीरिक हालचाली करत असाल तर ते योग्य मानले जाते. त्याचप्रमाणे जर एखाद्याने दररोज व्यायाम करण्याऐवजी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तीव्र व्यायाम केला तर त्यालाही तेवढाच फायदा होईल. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस व्यायाम करणे देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.


आठवड्याच्या शेवटी 'याचा' फायदा होतो.


असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या कामामुळे इतका वेळ काढू शकत नाहीत. संशोधकांनी 2011 ते 2018 या कालावधीत 20 ते 59 वर्षे वयोगटातील 9,600 लोकांवर संशोधन केले. संशोधनात असे दिसून आले की जे लोक आठवड्यातून फक्त एक किंवा दोन दिवस व्यायाम करतात त्यांचे वजन देखील कमी होते. ज्यांनी एक-दोन दिवस व्यायाम केला त्यांचे वजन दररोज व्यायाम करणाऱ्यांप्रमाणेच कमी होत होते. संशोधनाचे सह-लेखक आरोग्य शास्त्रज्ञ लिहुआ झांग यांनी सांगितले की, ऑफिसमध्ये काम करणारे लोक, बस ड्रायव्हर आणि जे लोक जास्त वेळ बसतात त्यांना वीकेंडला व्यायामाचा फायदा होतो. ते म्हणतात, "अशा लोकांना रोज व्यायाम करता येत नाही आणि त्यांच्याकडे रोज जिमला जाण्यासाठीही पुरेसा वेळ नसतो. आमचे संशोधन त्यांना पर्याय देते. असे लोक वीकेंडला धावणे, गिर्यारोहण, आणि सायकलिंगसारखे व्यायाम करू शकतात"


चला... हळूहळू सुरूवात तर करा...


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमच्याकडे आठवड्यातून फक्त एक किंवा दोन तासच व्यायामाचा वेळ असेल, तर तुम्ही हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवावी. जॉगिंगने सुरुवात करा किंवा तुम्ही झुंबा क्लासमध्ये सहभागी होऊ शकता. यानंतर हळूहळू तीव्रता वाढवा. मेडिकल न्यूज टुडेशी बोलताना ऑस्ट्रेलियन डॉक्टर केल्सम फ्रेझर म्हणतात, 'वेट ट्रेनिंगद्वारे तुम्ही वजन कमी करू शकता. आठवड्यातून दोनदा वेट ट्रेनिंग केल्यास तुमचे चयापचय गतिमान होते, ज्यामुळे नवीन स्नायूंना ताकद मिळते. याशिवाय, यासाठी तुम्हाला चांगली ऊर्जा देखील लागेल.


 


तुमचा आहारही तितकाच महत्त्वाचा!


वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तुमचा आहारही खूप महत्त्वाचा असल्याचं डॉक्टर सांगतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता आणि तुमचा आहार योग्य नसतो तेव्हा त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. यासोबतच जर तुम्ही जास्त तीव्रतेचा व्यायाम करत नसाल तर तुम्हाला तुमचा आहार त्यानुसार ठेवावा लागेल. अन्नातील पोषक घटकांची काळजी घ्या आणि शरीराच्या गरजेनुसार कॅलरीज घ्या.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


No Smoking Day 2024 :"...तर तो दिवस दूर नसेल, जेव्हा तुम्ही धूम्रपानापासून मुक्त व्हाल" आज धूम्रपान निषेध दिन! 'हे' घरगुती उपाय ट्राय करा