नाशिक : 'केमिकलचा वापर करून भाजीपाला टवटवीत केला जातो, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात' या आशयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचं एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमध्ये समोर आलं आहे..


'केमिकलचा वापर करून भाजीपाला टवटवीत केला जातो, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात' या आणि अशा विविध मेसेजेसमुळे भाजीपाला खरेदी करतांना आपली फसवणूक तर होत नाहीय ना? रोजच्या जेवणात शिळा भाजीपालाच आपण ताजा आहे समजून खात नाहीय ना? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दरम्यान एबीपी माझाने या संपूर्ण प्रकरणाचा रिअलिटी चेक केला. 


अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त  चंद्रशेखर साळुंखे म्हणाले,  हा सर्व प्रकार खोटा आहे. भाजीपाल्यासाठी असे कुठलेही केमिकल वापरले जात नाही, सेव्ह इको ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधीने इको पॉवर ऍक्टिव्ह प्लेस नावाच्या शेतीउपयोगी द्रव पदार्थाचे  चांदवड तालुक्यात एक प्रात्यक्षिक दाखवले होते. मात्र ते उभ्या पिकांवर दाखवण्याऐवजी त्याने ते आघाडा आणि गवतावर दाखवले आणि तिथल्या शेतकऱ्याने हा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला आणि पुढे तो विविध प्रकारे व्हायरल झाला. एकूण 20 मिनिटाचा व्हिडीओ होता मात्र तो मोजकाच पुढे आला. आम्हालाही हा सर्व प्रकार शोधणे खूप कठीण होते मात्र आम्ही सर्व तपास केला आणि कंपनीच्या प्रतिनिधींचाही जबाब नोंदवून घेतला आहे.   



18  जुलै 2021 रोजी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एका शेतावरील हा व्हिडीओ जवळपास प्रत्येक व्हॉट्स अॅप ग्रुपवर वाऱ्यासारखा पसरल्याने संपूर्ण महाराष्ट्रातच हा चर्चेचा विषय बनला होता. तसेच अन्न, औषध प्रशासन विभागाचीही यामुळे चांगलीच डोकेदुखी वाढली होती. संबंधित व्हिडीओत दिसणाऱ्या एका दुचाकीच्या क्रमांकांवरून हा व्हिडीओ कुठला असावा याचा शोध घेण्यात आला. नाशिक पोलिसांचीही यासाठी मदत घेण्यात आली होती. अखेर गाडीच्या नंबर वरून माग घेत असतांनाच सेव्ह इको ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधी पर्यंत प्रशासन जाऊन पोहोचले आणि या सर्व प्रकाराची पोलखोल झाली.


 कुठलीही खातरजमा न करता अशा पोस्ट व्हायरल करू नका, तसेच असे प्रात्यक्षिके दाखवतांनाही योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे,  अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त  चंद्रशेखर साळुंखे म्हणाले.


 व्हायरल पोस्टमुळे अन्न व औषध प्रशासन विभाग असो वा पोलिस सर्वच यंत्रणा कामाला लागली होती आणि अखेर या प्रकरणाचा उलगडा होताच प्रात्यक्षिके चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आल असून समाजात गैरसमज निर्माण होईल असे कृत्य करणार नाही असा जबाब सेव्ह इको ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधीने प्रशासनाकडे नोंदवला आहे. एकंदरीतच काय तर एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमध्ये हा सर्व प्रकार खोटा असल्याचं समोर आलं असून अशा कुठल्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका.