रत्नागिरी : नारळाला भारतात कल्पवृक्ष संबोधलं जातं. स्वयंपाकापासून देवपूजेपर्यंत प्रत्येक ठिकाणी नारळाला महत्त्वाचं स्थान आहे. अशा श्रीफळाविषयीच्या एका दाव्याने प्रत्येक जण अचंबित झाला आहे. ज्या झाडाच्या मुळापासून पानाच्या टोकापर्यंतचा प्रत्येक भागाचा वापर केला जातो, अशा नारळाच्या तेलाच्या वापरामुळे चक्क हृदयरोगाचा धोका असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. नारळाविषयी वायरल होणारे सगळे दावे 'माझा'च्या 'वायरल चेक'मध्ये खोटे ठरले आहेत.

सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी केसांना तेल लावणं हा जणू आपल्या जगण्याचा एक भागच झाला आहे. पण सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या एका मेसेजमध्ये ही रोजची सवय जीवघेणी ठरु शकत असल्याचा दावा केला जात होता.

काय आहे वायरल मेसेजमधील दावा?

केसांच्या वाढीसाठी किंवा केस दाट होण्यासाठी तेल लावणे गरजेचे आहे असा समज आजही सामान्यांमध्ये दिसतो. मात्र हेच खोबरेल तेल खूप विषारी असल्याचा शोध हार्वर्डमधील एका प्राध्यापिकेने लावला आहे. याचाच अर्थ आपण केसाला रोज विष लावतो असाच त्याचा अर्थ होतो. या प्राध्यापिकेने या विषयाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला असून तो मोठया प्रमाणात वायरलही झाला आहे. नारळाचे तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे संशोधन या प्राध्यापिकेने केले आहे. करीन मिशेल असे या प्राध्यापिकेकेचे नाव असून तिने आपला शोधनिबंध सादर केला आहे. खोबरेल तेलात स्निग्धतेचे प्रमाण हे कैक पटींनी जास्त असल्याने ते आरोग्यासाठी चांगले नसते असा तिने दावा केला आहे.

सोशल मीडियावर वायरल केलेल्या दाव्यात हार्वर्डसारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठाच्या नावाचा वापर केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचीच सत्यता पडताळण्यासाठी आम्ही कोकण कृषी विद्यापीठाच्या नारळ संशोधन केंद्रात तज्ज्ञांशी बातचित केली.

नारळ बोर्डाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी नारळाविषयी वायरल होणारी माहिती पूर्णतः खोडसाळ असल्याचं सांगितलं. नारळ तेल विषारी असल्याचा दावा चुकीचा असल्याचंही लिमयेंनी सांगितलं.

नारळावर संशोधन करणाऱ्या मंडळींनी सोशल मीडियावरील दावा फेटाळलाच पण न्यूट्रीशन एक्स्पर्ट कोमल तावडे यांनीही नारळाचा स्वयंपाकातील वापर धोकादायक नसल्याचं स्पष्ट केलं.

नारळ संशोधक, न्यूट्रीशियन या सर्वांनी वायरल दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. इतकचं काय भारत सरकारच्या कृषी विभागानेही या वायरल पोस्टची दखल घेत हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिकेने केलेल्या दाव्याला कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नारळाविषयी वायरल होणारे सगळे दावे 'माझा'च्या 'वायरल चेक'मध्ये खोटे ठरले आहेत.