Rose Day 2024 : फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेल्यांसाठी विशेष असा असतो. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day) असला तरीही त्याची सुरूवात मात्र एक आठवडा आधीपासूनच होते. त्यामुळे अनेकजण या व्हॅलेंटाईन वीकची (Valentine's Week) आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या रोज डे पासून होते तर शेवट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ने होते. आजचा रविवार रोज डे अर्थात गुलाब दिवसाच्या स्वरुपात साजरा केला जातो.


आजपासून व्हॅलेंटाईनची वीकची सुरुवात झाली असून तो जगभरातील तरुणांकडून उत्साहाने साजरा केला जातो. तसं पहायला गेलं तर व्हॅलेंटाईन वीक किंवा हे वेगवेगळे डे हे पाश्चात्य संस्कृतीचे लक्षण. सुरुवातीच्या काळात केवळ मोठ्या शहरात साजरे करण्यात येणारे हे डे आता गावागावतही साजरे केले जातात. महाविद्यालयातील तरुणांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.


गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतिक


व्हॅलेन्टाईन वीकची सुरुवात आज 'रोज डे'ने (Rose Day)  झाली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. गुलाब हे प्रेमाचं प्रतिक समजलं जातं. आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतो. प्रेमात पडलेल्यांसाठी गुलाबाचं महत्व मोठं असतं, त्यांचं अवघं आयुष्यच गुलाबी होऊन जातं.


भारतात प्राचीन काळापासून, अगदी राजा-महाराजांपासून प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतोय. आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करता येत नसतील तरीही आपल्या आवडत्या व्यक्तीला केवळ गुलाब दिलं तरी भावना पोहचतात. यामध्ये लाल रंगाच्या गुलाबाचा वापर केला जातो. त्या व्यतिरिक्त इतर अनेक रंगाचे गुलाब अनेक भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. गुलाबाच्या रंगाप्रमाणे आपल्या मनातील भावनाही बदलतात.


लाल गुलाब (Red Rose)


आपल्याकडे लाल गुलाबाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. आपल्या मनातील प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो. प्रेमी युगुलांच्या जीवनात लाल गुलाबाला मोठं महत्व असतं. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो.


पांढरे गुलाब (White Rose) 


निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक पांढरा रंग हा तसा शांततेचं प्रतिक समजले जाते. त्यामधून पवित्रता आणि शांतीची भावना व्यक्त होते. जर तुम्ही कोणावर शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला पांढरे गुलाब देऊ शकता. आपल्या नात्यातील प्रेम दर्शवण्यासाठी या गुलाबांचा वापर केला जातो. कोणत्याही नात्याची सुरुवात करताना या रंगाचे गुलाब देण्यात येतात. महत्त्वाचं म्हणजे नात्याची शेवट करतानाही याच रंगाचे गुलाब देण्यात येतात.


गुलाबी गुलाब (Pink Rose) 


गुलाबी रंग हा प्रोत्साहनाचा, प्रेरणेचा रंग मानला जातो. तसेच आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याची कबुली या गुलाबी गुलाबातून देता येते. आपण कोणाकडून प्रेरित झाला असाल किंवा कोणाला आपला आदर्श मानत असाल तर त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.


केशरी गुलाब  (Orrange Rose) 


केशरी रंग हा त्यागाचे आणि वीरतेचे प्रतिक मानला जातो. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल किंवा त्याच्या प्रती समर्पणाची भावना असेल तर त्या व्यक्तीला केशरी रंगाचे गुलाब देऊ शकता. या रंगाचे गुलाब दुर्मीळ आहे. तसंही या रंगाप्रमाणे खरे प्रेमही दुर्मीळ असल्याचं दिसतंय.


पिवळे गुलाब (Yellow Rose) 


मैत्रीचे प्रतिक म्हणजे पिवळा रंग मानला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणी ना कोणी खास मित्र असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करु शकतो. जर तुमच्यातील मित्रत्वाचे संबंध समुद्राप्रमाणे अथांग असतील तर अशा व्यक्तीला तुम्ही पिवळे गुलाब देऊ शकता आणि आपल्या मैत्रिची भावना व्यक्त करु शकता.


आता गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगाचे महत्व तर तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे आज रोज डे च्या निमित्ताने आता कुणाला कोणता गुलाब द्यायचा आणि कशा भावना व्यक्त करायच्या हे तुम्हीच ठरवा. 


ही बातमी वाचा: