Tulsidas Jayanti 2022 : आज संत तुलसीदास (Tulsidas Jayanti ) यांची जयंती आहे. ते भारतातील एक हिंदू संत कवी होते. 'रामचरितमानस'ची आठवण आली तर आपोआपच गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते. काशी आणि अयोध्या येथे श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना तुलसीदास यांनी केल्या. आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालीसा ही देखील तुलसीदास यांचीच रचना आहे. तुलसीदास यांनीच रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली, असेही सांगितले जाते.


तुलसीदास यांचा जन्म सन 1497 साली उत्तर प्रदेशच्या चित्रकुट जिल्ह्यातील रामपूर गावात झाला, असे मानले जाते. त्यांचा जन्म झाल्यावर ते  रडले नाही तर त्यांनी, जन्मल्या जन्मल्याच श्रीरामाचे नाव घेतले, असेही सांगितले जाते. त्यामुळं त्यांचे नाव रामबोला असे पडले. आईच्या अकाली मृत्यूनंतर एका दासीने या बालकाचा सांभाळ केला. काही काळानंतर नरहरीनंद स्वामी नावाचे गृहस्थ शोध घेत घेत तुलसीदासांपर्यंत पोहोचले आणि त्यांना अयोध्येला नेले.


भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी तुलसीदास यांचे प्रयत्न
 
तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केलं. तत्कालीन हिंदू समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले. त्यांनी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्यानं अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदू धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली. हिंदी रामायणाशिवाय डोहावली, कवितावली, गीतावली, कृष्णावली आणि विनयपत्रिका असे 5 ग्रंथही त्यांनी लिहिले. सुप्रसिद्ध हनुमान चालीसा ही तुलसीदास यांचीच रचना आहे. तुलसीदासांना प्रचंड लोकप्रियता मिळाली याचे कारण त्यांनी जो नवा मार्ग सांगितला त्याला परंपरेची भक्कम बैठक दिली. वेद, उपनिषदे, गीता, भारतीय दर्शने, वाल्मीकी रामायण यांच्या आधाराने त्यांनी आपले विचार लोकांच्या पुढे ठेवले. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानले जाते. त्यांनी संस्कृतमधील वाल्मीकी रामायणाचे अवधी भाषेत रुपांतर करून त्याचे नाव 'रामचरितमानस' असे ठेवले. हे लेखन त्यांनी निव्वळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते.


रामबोला असं का म्हटल जातं


तुलसीदास हे आपल्या रामभक्तीमुळं प्रसिद्ध होते. त्यांना रामायणाची रचना करणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचा कलयुगी अवतार सुद्धा मानले जाते. तुलसीदास यांचे नाव रामबोला असे होते. या नावामागे एक कथा आहे.  तुलसीदास यांचा जन्म हा इतर मुलांसारखा झाला नसून फार अद्वितीय स्वरुपानं झाला होता. तुलसीदास हे आपल्या आईच्या गर्भात जवळपास 12 महिने राहिल्यानंतर जन्माला आले. विशेष म्हणजे जन्मतःच त्यांना पूर्ण दात देखील होते. जन्माला आल्या आल्या त्यांच्या मुखातून प्रथम शब्द हा 'राम' निघाला होता. याच कारणामुळे त्यांचे नाव रामबोला असे ठेवण्यात आले होते.


रामबोला तुलसीदास कसे झाले 


रामबोला यांचे तुलसीदास कसे झाले यामागे सुद्धा एक कथा आहे. तुलसीदास यांच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. तिच्या प्रेमात ते इतके बुडाले होते की, ते एक क्षण सुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नव्हते. एके दिवशी पत्नी माहेरी गेली असे कळल्यावर तुलसीदास खूप व्यथित झाले. तिला भेटण्याकरता व्याकूळ झालेले तुलसीदास रात्रीच्या घनदाट काळोखात नदी पार करुन गेले. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला आवडली नाही व दोघांमध्ये वाद निर्माण झाला. रात्नावलीने त्यांना खालील दोह्यामधून फटकारले. या दोह्यामुळं रामबोलाचे मतपरिवर्तन झाले आणि यातूनच तुलसीदास यांचा जन्म झाला.