Buldhana News: लाच (Bribe)कशासाठी घ्यावी किंवा द्यावी याचा अंदाज न लावलेलाच बरा. आजकाल कुठेही क्षुल्लक कारणांसाठी लाच मागितली जाते. ती लाच अगदी 100 रुपयांपासून ते लाखोंमध्ये असते. शिक्षण क्षेत्रातही लाचखोरीचं प्रमाण कमी नाही. बुलढाण्यात असाच एक लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यातील एका महाविद्यालयात (Buldhana Collage Bribe) अकरावीच्या प्रवेशासाठी लाच घेतल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकांसह चौघांना जेरबंद करण्यात आलं आहे.
माहितीनुसार बुलढाण्यातील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 11वी च्या विज्ञान शाखेत प्रवेश देण्याकरता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं आहे. या चौघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास भारत विद्यालय बुलढाणा येथे सदर कारवाई करण्यात आली.
चौघाजणांना एसीबीकडून अटक
मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड यांच्यासह गजानन सुखदेव मोरे, जितेंद्र प्रल्हाद हिवाळे, राहुल विष्णू जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तक्रारदाराच्या मुलाला अकरावीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या वतीने वस्तीगृह कार्यवाहक गजानन मोरे याने पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली.
हे एक षडयंत्र, महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण
तडजोडीअंती दहा हजारात सौदा पक्का केला गेला. आरोपी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केले तर आरोपी लेखापाल राहुल विष्णू जाधव याने मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चारही आरोपींना रंगेहात अटक केली. दरम्यान भारत विद्यालय हे अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असत आणि त्यामुळे हे एक षडयंत्र असल्याचं भारत विद्यालयाचे उपाध्यक्ष उदय देशपांडे यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या