Travel : मन उधाण वाऱ्याचे.. गुज पावसाचे.. का होते बेभान.. 'अगंबाई अरेच्चा' या मराठी चित्रपटातील हे गाणं सर्वांनाच माहित आहे, हेच नाही आता आणखी पावसाची गाणी प्रत्येकाच्या ओठी गुणगुणताना दिसतील. कारण पावसाळा आला की सोबत उत्साहही घेऊन येतो. निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद जगता यावं यासाठी अनेकजण पावसाली पिकनिक प्लॅन करताना दिसतील.  पावसाळ्यात निसर्ग बहरतो, या ऋतूत प्रत्येकालाच निसर्गसुख अनुभवावेसे वाटते. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर जवळपास अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पावसाळ्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला मुंबईच्या आजूबाजूचे काही खास धबधब्यांबद्दल सांगत आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचं टेन्शन विसराल आणि पाऊस एन्जॉय कराल..


 




कर्जत


मुंबईपासूनच काही अंतरावर असलेले कर्जत, हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर पावसाळी डेस्टीनेशन आहे, हे ठिकाण हिरवेगार देखावे, नद्या आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही वर्षातील कोणत्याही महिन्यात येथे येऊ शकता आणि आरामदायी सुट्टी घालवू शकता. हे ठिकाण मुंबई-पुणे शहरापासून एक उत्कृष्ट वीकेंड गेटवे मानले जाते. रिमझिम पावसासह येथील डोंगर दऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात.


मुंबई पासून अंतर: 63 किमी.




पांडवकडा धबधबा


पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईत आहे. पौराणिक कथांनुसार महाभारतातील पाच पांडव बांधवांनी या धबधब्याखाली स्नान केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या धबधब्याला पांडव कडा धबधबा असे नाव पडले. हा खळखळणारा धबधबा नवी मुंबईतील एक आदर्श पिकनिक स्पॉट आहे. या धबधब्यात आंघोळ किंवा पोहण्याऐवजी या धबधब्याजवळ शांत बसून त्याचे सुंदर दृश्य पाहत राहणे आणि त्याच्या सौंदर्यात पूर्णपणे मग्न होणे हा अधिक सुंदर अनुभव असेल. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे, कारण याच्या मध्यभागी एक तलाव आहे, दुर्दैवाने या धबधब्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. म्हणून, जेव्हाही तुम्ही या धबधब्याला भेट द्याल तेव्हा पूर्ण सावधगिरी बाळगा आणि त्याच्या अद्भुत सौंदर्याचा पुरेपूर आनंद घ्या.


मुंबईपासून अंतर: 30 किमी.




भगीरथ धबधबा


वांगणी येथे असलेला भगीरथ धबधबा.. मुंबईच्या लोकांसाठी हा धबधबा भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे, इथे तुम्ही एका दिवसासाठी पिकनिक स्पॉट एन्जॉय करू शकता. कारण ज्यावेळी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे परिसर हिरवागार, सुंदर, नयनरम्य होतो. वांगणीचा हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच तो सुरक्षित आहे. धबधब्याच्या सभोवतालचा परिसर एक अतिशय शांत आणि सुंदर वातावरण प्रदान करतो आणि म्हणूनच भगीरथ धबधबा निसर्गाच्या कुशीत आराम आणि शांतता बनवतो. जगभरातील लोक निवांतपणा, समाधानासाठी या मंत्रमुग्ध करणाऱ्या धबधब्याला भेट देतात.


मुंबई पासून अंतर: 67 किमी.




माळशेज धबधबा


मुंबईपासून काही अंतरावर पावसाळ्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे माळशेज धबधबा. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासारखा आहे. या फॉलच्या सभोवतालचे दृश्य आणखी आश्चर्यकारक असतात. पावसाळ्यात अनेक वेळा या धबधब्याचे पाणीही रस्त्यावर येते. एक प्रकारे हे ठिकाण निसर्गप्रेमीसाठी खूप खास ठरते. येथे तुम्ही कुटुंब, मित्र किंवा तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.


मुंबई पासून अंतर: 128 किमी.




धोबी धबधबा


हा धबधबा महाबळेश्वर येथे आहे, असे म्हटले जाते की या धबधब्याचे पाणी सुरुवातीला महाबळेश्वरचे स्थानिक लोक वापरत होते. त्यामुळे या धबधब्याला 'धोबी' असे नाव पडले. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल, स्वर्गसुख अनुभवण्यासाठी या धबधब्याचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसते, पाण्याचा आवाज तुमच्या हृदयाला भिडतो. तुम्हाला इथे आल्यावर नक्कीच मनःशांती मिळेल.


मुंबई पासून अंतर: 264 किमी.




लिंगमाला धबधबा


हिरवीगार चादर पांघरलेले महाबळेश्वर पावसाळ्यात प्रेक्षणीय आणि चैतन्यमय दिसते. आणि याच हिरव्यागार सौंदर्यात भर पाडणारा लिंगमाला धबधबा एखाद्या नाचणाऱ्या देवदूतासारखा भासतो. लिंगमळा धबधबा त्याच्या सौंदर्याने महाबळेश्वरच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. वरून कोसळणारा हा धबधबा खाली वाहत जाऊन वेण्णा तलावाला मिळतो.


मुंबई पासून अंतर: 256 किमी.




रंधा धबधबा



भंडारदऱ्यातील हा धबधबा जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे, जिथे हजारो लोक भेट देण्यासाठी येतात. पावसाळ्यात दरीत कोसळणाऱ्या 170 फूट उंच भव्य धबधब्याचे दृश्य पाहण्यासारखे असते. जिथे तुम्ही पर्वतांच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.


मुंबई पासून अंतर: 165 किमी.




अम्ब्रेला धबधबा


अम्ब्रेला वॉटरफॉल हा केवळ हंगामीच नाही तर विशिष्ट कालावधीसाठी प्रसिद्ध देखील आहे. हा धबधबा भंडारदरा येथे आहे. पावसाळ्यात आणि धरणातून पाणी सोडल्यावर तुम्ही पाण्याच्या सुंदर पांढऱ्या छत्रीचा आनंद घेऊ शकता. शनिवारी आणि रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पाणी सोडले जाते. त्यामुळे या वेळेनुसार या ठिकाणाला भेट दिल्यास तुमचा दिवस अविस्मरणीय होईल.


मुंबई पासून अंतर: 161 किमी.




भिलार धबधबा


भिलार धबधबा हा पाचगणी येथे आहे. जो फक्त पावसाळा आणि हिवाळ्यात वाहतो. भिलार धबधबा येथे येणाऱ्या पर्यटकांना शांततेचा अनुभव देतो.


मुंबई पासून अंतर: 248 किमी.




ठोसेघर धबधबा, ठोसेघर


ठोसेघर धबधबा हे कोकण प्रदेशाच्या काठावर असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. हा एक मोसमी धबधबा आहे जो फक्त पावसाळ्यातच दिसतो. सुंदर हिरव्यागार टेकड्यांच्या उंच उतारावरून पडणारे दुधाळ पांढरे पाणी एक आनंददायी अनुभव देते, जे पाहून तुम्हाला विलक्षण आनंद मिळेल.


मुंबईपासून अंतर : 280 किमी.


 


हेही वाचा>>>


Travel : हेच ते सुख! महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणाची इंग्रजांनाही भुरळ, महाबळेश्वरच्या शेजारचं सुंदर हिल स्टेशन


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )