Teach Good Touch-Bad Touch: राज्यात सध्या बदलापूरमधील अत्याचार प्रकरणांने अंगावर काटा आला आहे. चार आणि सहा वर्षांच्या मुलींवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. राज्यासह देशात लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. आपल्या मुलींना शाळेत कसं पाठवायचं या विचारापर्यंत पालक पोहोचले आहेत. अशावेळी पालक म्हणून मुलांच्या सुरक्षेसाठी काही विशेष पावले उचलायला हवीत. लहान मुलींवर वाईट नजर असणाऱ्या व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखायचा, गुड टच बॅड टच कसा ओळखायचा हे मुलींना समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे.
लहानग्या मुलींना प्रेमानं मारलेली मिठी, जवळ घेण्यातला, लाड करण्यातला फरक समजावून सांगणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रायवेट पार्टला कोणही व्यक्ती स्पर्श करत असेल तर हे वाईटच हे मुलांना त्यांच्या भाषेत, गोडीत समजावून सांगणं गरजेचं असल्याचं तज्ञही सांगतात. अनेकदा मुलांना काय कळतं अशा भावनेतून त्यांना बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी दूर्लक्ष केलं जातं. पण घटना घडल्यानंतर पश्चातापापेक्षा काहीच हातात रहात नाही. पण कसं समजावून सांगायचं, गुडटच आणि बॅडटचमधला फरक?
आपल्या मुलांना चांगला स्पर्श आधी सांगा
वाईट स्पर्श कसा असतो, हे सांगण्याआधी चांगल्या स्पर्शाची ओळख आपल्या मुलांना आधी करून देणं गरजेचं आहे. स्पर्श करण्याआधी त्यांना गुडटच समजावणं गरजेचं आहे. जेंव्हा कोणताही व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि त्यातून तुम्हाला चांगलं वाटतं, त्या स्पर्शानं सुरक्षित वाटतं तो स्पर्श चांगला. ही गोष्ट मुलांना समजाऊन सांगताना प्रेमानं जवळ घेणं, मिठी मारणं, मायेनं किस करणं गरजेचंय. तुमचा हात पकडल्यावर मुलांना काय वाटतं याकडे त्यांचं लक्ष वेधा. एखाद्याचा हात पकडल्यावर तुम्हाला चांगलं वाटलं, सुरक्षित वाटलं तर तो चांगला असं समजावं. मात्र, एखाद्याच्या स्पर्शानं त्रास होतोय असं वाटलं तर तातडीनं त्या व्यक्तीपासून दूर राहावं.
बॅड टचविषयी आपल्या मुलांना कसं सांगावं?
कोणताही वाईट स्पर्श कसा असतो हे मुलांना सांगणं फार अवघड वाटू शकतं. पण हे सांगणं खूप गरजेचं आहे. चांगल्या स्पर्शापेक्षा अतिशय विरुद्ध हा बॅड टच असतो. ज्या स्पर्शामुळं त्रास होतो. जो टच आपल्याला चूकीचा वाटतो तो बॅड टच हे मुलांना समजाऊन सांगावं. विशेषत: मुलींना आपले प्रायवेट पार्ट कोणते याची माहिती करून द्यावी. तिथे कोणालाही हात लाऊ देऊ नये हे सांगणं गरजेचं आहे. जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीपासून दूर होणं आणि घरी येऊन आई वडिलांना सांगणंही गरजेचं आहे. यात कोणतीही माहिती देण्यासाठी कचरू नये. कोणतीही लाज बाळगू नये. संकट काळात मदत कशी मागायची हेही मुलांना समजवायला हवं.
लहान मुलांशी संवाद ठेवा, तुमचं नातं घट्ट करा
पालक आणि मुलांच्या नात्यात मैत्रीचा संवाद असणं फार गरजेचं असल्याचं तज्ञही सांगतात. कोणतीही गोष्ट सांगण्यास मुलांनी आपल्याला घाबरू नये हे वाटणं सहाजीक, पण ती गोष्ट सांगण्यासाठी सुरक्षित वातावरण देणं पालकांच्या हातात आहे. यासाठी मुलांना विश्वासात घेणं, त्यांना बाहेर खेळायला घेऊन जाणं. शाळेत कोणते मित्र त्यांच्या जवळचे आहेत. कोणते शिक्षक काय म्हणाले याची माहिती ठेवा. अनेकजण शाळेत भित्री असतात. त्यांना गुडटच, बॅडटच याची ओळख करून देणं, त्यातील फरक समजाऊन सांगणं अत्यंत आवश्यक आहे. संकटकाळात त्यांना तयार करणं गरजेचंय.