Skin Care Tips : हिवाळा (Winter) सुरु झाला आहे. जसजसा वातावरणात थंडावा जाणवतोय तशा त्वचेशी संबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत. थंडीमुळे त्वचेचा ग्लो कमी होतो, त्यामुळे या ऋतूत त्वचेची काळजी (Skin Care Tips) घेणं अधिक गरजेचं आहे. या ऋतूमध्ये काही लोकांची त्वचा कोरडी होते, तर काहींची त्वचा तेलकट दिसते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक उत्पादने वापरूनही चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होत नाही. जर तुमची त्वचा देखील तेलकट असेल तर हिवाळ्यात हा फेसपॅक नक्की वापरून पाहा. तो कसा बनवायचा त्याची पद्धत जाणून घेऊयात.
मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक
मुलतानी माती त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करते. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्हाला तेलकट त्वचेपासून सुटका हवी असेल तर हा फेस पॅक नक्की वापरा. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्या, त्यात गुलाबजल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
संत्र आणि चंदनाचा फेस पॅक
व्हिटॅमिन सी समृद्ध संत्र आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर झटपट ग्लो आणायचा असेल तर तुम्ही संत्र आणि चंदनाचा फेस पॅक वापरू शकता. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे संत्र्याचा रस घाला. त्यात 1 चमचे चंदन पावडर आणि कॅलामाईन पावडर मिसळा. आता या मिश्रणाची पेस्ट तयार करा. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण 15-20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
गाजर आणि मधचा फेस पॅक
हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी हा एक उत्तम फेसपॅक ठरू शकतो. हा फेस पॅक त्वचेवर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. गाजरातील बीटा कॅरोटीन मृत त्वचेपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी गाजर किसून त्यात मध मिसळा. या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. साधारण 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा.
बेसन आणि हळद फेस पॅक
हळद आणि बेसनाचा फेस पॅक ग्लोईंग त्वचेसाठी सर्वात चांगला फेसपॅक मानला जातो. जर तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये बेसन आणि हळदचा समावेश करा. हा पॅक बनवण्यासाठी बेसनामध्ये हळद आणि दूध मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. काही मिनिटे चेहऱ्यावर हा पॅक राहूद्या नंतर चेहरा पाण्याने धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :