Siblings Day 2022: आपण त्यांच्यावर प्रेम करतो, कधी कधी त्यांचा तिरस्कारही करतो, त्यांच्याशी भांडतो, सर्वात मौल्यवान आठवणीही शेअर करतो, त्यांच्याशी स्पर्धा करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्यांच्याशिवाय जगू शकत नाही! असे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे सदस्य म्हणजे आपली ‘भावंड’. ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि आपण नेहमीच सगळ्या गोष्टी पहिला त्यांच्याशी शेअर करतो.


आपल्या आई-वडिलांव्यतिरिक्त आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणून भावंडांसोबतचे आपले बंध खूप मौल्यवान आहेत. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आहे ‘भावंड’ दिवस! (Siblings Day 2022) दरवर्षी, 10 एप्रिलला ‘भावंड दिवस’ अर्थात ‘सिबलिंग डे’ साजरा केला जातो.


‘भावंडं दिवसा’चे महत्त्व आणि इतिहास


या खास दिवशी लहानपणापासून आपल्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल आणि त्यांच्या उपस्थितीने आपले जीवन अधिक चांगले बनवल्याबद्दल भाऊ आणि बहिणींचे आभार मानले जातात. आपले जीवन आणि आपण मोठे झाल्यावर जी व्यक्ती बनतो, त्याला आकार देण्यासाठी भावंडांची महत्त्वाची भूमिका असते.


या दिवशी, भावंडे भेटवस्तू देऊन, एकमेकांना मिठी मारून त्यांचे प्रेम व्यक्त करून, एकमेकांच्या आवडत्या गोष्टीत दिवस व्यतीत करून, नोट्स पाठवून आणि बरेच काही स्पेशल करून एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जर तुमचा एखादा चांगला मित्र असेल, जो तुमच्यासाठी मित्रापेक्षाही जास्त तुमचा भाऊ किंवा बहिणीसमान असेल, तर तुम्ही त्यांना या दिवशी शुभेच्छा देऊ शकता.


काय आहे या मागची कथा?


क्लॉडिया एवार्ट नावाच्या महिलेने अगदी लहान वयातच आपला भाऊ आणि बहीण गमावल्यानंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. पहिला ‘भावंड दिवस’ 1995 मध्ये साजरा करण्यात आला. भावंडांचं आपल्या जीवनात महत्त्व आणि त्यांची आपल्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका यावर जोर देणे, हा दिवस साजरा करण्याचा क्लॉडियाचा उद्देश होता. यासाठी तिने 10 एप्रिल हा दिवस निवडला, कारण या दिवशी तिची बहीण लिसेटची जयंती असते. याव्यतिरिक्त, तिने त्याच वर्षी ‘सिबलिंग डे फाउंडेशन’ची (SDF) स्थापना केली. SDF  अंतर्गत, परिस्थिती, जन्म आणि दत्तक विधान किंवा परस्पर कौटुंबिक समस्यांमुळे विभक्त झालेल्या भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.


हेही वाचा :