मुंबई : मोबाईलमध्ये सेल्फी घेणं आणि तो सोशल मीडियावर शेअर करणं हा सध्याचा ट्रेंड बनला आहे. तुम्हालाही ही सवय असेल तर सावधान. कारण सतत सेल्फी काढावसं वाटणं हा एक मानसिक रोग असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.
'द सन'च्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. 'selfitis' ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्तीला सतत सेल्फी काढत राहून तो सोशल मीडियावर पोस्ट करावासा वाटतो. 'selfitis' या शब्दाचा शोध 2014 मध्ये लागला, मात्र हा शब्द विज्ञानापासून अजून दूर आहे, असं मानसोपचारतज्ञांचं म्हणणं आहे.
नॉटिंघम ट्रेंट युनिव्हर्सिटी आणि थियागररॉजर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. शिवाय यातून सहा मुद्देही समोर आणले आहेत. ही एक अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये हातात मोबाईल नसल्याची व्यक्तीला भीती वाटते. हातात मोबाईल नसल्यास अस्वस्थता वाढते.
'selfitis' चा अभ्यास करताना 200 भारतीयांचा समावेश करण्यात आला होता. कारण भारतामध्ये फेसबुकचे युझर्स मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही भारतात समोर आलेल्या आहेत. selfitis Behaviour Scale ने भारतीयांची चाचणी करण्यात आली.
'selfitis' या परिस्थितीला अमेरिकन मानसोपचार तज्ञांनी मनोविकार म्हणून जाहीर केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं काही दिवसांनी समोर आलं.
दरम्यान 'selfitis' हा मानसिक रोग असल्याचं आता संशोधकांनीही मान्य केलं आहे. ही परिस्थिती अस्तित्वात असल्याला आता दुजोरा मिळाला असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. हे संशोधन असंच कायम राहणार असून यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
नोट : हे वृत्त संशोधनाच्या आधारावर करण्यात आलं आहे. एबीपी माझा या संशोधनाची पुष्टी करत नाही. तुम्हाला संशोधनातील कोणत्याही सल्ल्याला अनुसरुन उपचार घ्यायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.