Health Tips : तरूण, सुंदर आणि फिट राहणं कोणाला आवडत नाही. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी वाढतं वय कोणालाच थांबवता येत नाही. अनेकांच्या वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर, शरीरात बदल दिसू लागतात. मात्र, वाढत्या वयात काही उपाय नक्कीच केले जाऊ शकतात, ज्याच्या मदतीने केवळ तंदुरुस्त राहता येत नाही तर तरुणपण देखील टिकवता येते. त्यामुळे वयाच्या 40 व्या वर्षीही तुम्हाला तरुण दिसायचे असेल, तर लवकरात लवकर तुमच्या आहारातून काही पदार्थ काढून टाकणे गरजेचे आहे. हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या.
रिफाइंड कार्बोहाइड्रेट (कर्बोदके) :
रिफाइंड कार्बोहायड्रेट हे कोणत्याही वयात चांगले नसतात. परंतु, चाळीशी गाठल्यानंतर ते पूर्णपणे बंद केले पाहिजे. या कार्बोहायड्रेट्समध्ये पास्ता, डोनट्स, व्हाईट ब्रेड, कुकीज, पॅनकेक्स यांसारख्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश होतो. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे हार्मोनल बिघाड होतो आणि त्वचेची रचना बिघडते.
प्रोसेस्ड फूड :
सॉसेज, डुकराचे मांस इत्यादी प्रक्रिया केलेले मांस चरबीचे प्रमाण जास्त असते. यामुळे जळजळ वाढते. जर तुम्हाला मांस खायचे असेल तर सेंद्रिय मांस खा आणि ते बनवताना कमीतकमी तेल आणि मसाले वापरा.
फास्ट फूड :
फास्ट फूड चवीला जरी कितीही चांगले लागले तरी मात्र, आरोग्यासाठी ते घातक आहेत. यामध्ये साखर, चरबीचे प्रमाण, नायट्रेट्स, सोडियम आणि इतर अनेक हानिकारक घटक असतात. ते तुमच्या शरीराची रासायनिक रचना खराब करतात. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहा.
पॅक केलेले फ्रूट ज्यूस :
बाजारात मिळणारा कोणताही पॅकेज केलेला फळांचा ज्यूस तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढविण्याव्यतिरिक्त कोणतेही काम करत नाही. त्यामध्ये अगदी कमी प्रमाणात फायबर देखील नसतात. हे ज्यूस फक्त मधुमेहाचा धोका वाढवतात.
अल्कोहोल टाळा :
अल्कोहोलचे सेवन कोणत्याही वयोगटासाठी घातकच आहे. मात्र, वयाच्या चाळीशीनंतर अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळावे. वाढत्या वयाबरोबर शरीर त्याचे योग्य प्रकारे चयापचय करू शकत नाही आणि यकृत देखील ते योग्यरित्या पचवू शकत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :