पंढरपूर: पंढरपुरात (Pandharpur) माघ शुद्ध पंचमी (Vasa अर्थात वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने आज विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. सकाळपासूनच या आगळ्या वेगळ्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. विठ्ठल मंदिराला विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. आजच्या विवाहसोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला आहे . यावर्षी विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहे .
व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगभरात साजरा केला जातो . तिसऱ्या शतकात क्रूर रोम सम्राटाने प्रेमी युगुलांवर अत्याचार केले होते . त्याला व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरूने विरोध करत प्रेमाचा संदेश दिला म्हणून त्याला बंदी बनवून आज फाशी दिली होती. यासाठी आजचा दिवस व्हॅलेंटाईन यांच्या नावावरून व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो . मात्र जगातील पहिले प्रेमपत्र द्वापार युगात रुक्मिणीमातेने श्रीकृष्ण अर्थात विठुरायाला लिहिले. श्रीकृष्णने रुक्मिणीचे लग्नमांडवातून हरण केले अशी कथा आहे.रुक्मिणी मातेचे स्वयंवर होणार होते यासाठी देशोदेशीचे राजकुमार आले होते . पण मातेने श्रीकृष्णाला मनोमन वरले असल्याने तिने श्रीकृष्णाला संस्कृत श्लोकातून आपल्याला घेऊन जाण्यासाठी पाचारण केले होते . हीच रुक्मिणी स्वयंवराची कथा सध्या विठ्ठल मंदिरात सुरु असून या कथेतील स्वयंवराचा भाग आल्यावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह होणार आहे . यासाठी द्वापार युगात मग शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमीचा मुहूर्त होता म्हणून आज हा विवाह करण्याची परंपरा आहे .
रुक्मिणी माता पांढऱ्या रंगाच्या पैठणीत सजली
आज विवाहानिमित्त देवाच्या लग्नानिमित्त विठ्ठल रुक्मिणीची पारंपारिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा करण्यात आली . यावेळी विठूरायाला शुभ्र पांढऱ्या वस्त्रात सजविण्यात आले होते , मस्तकावर पांढरी पगडी , अंगात जरीकाठी रेशमी अंगी , कमरेला पंधरा शेला आणि पांढरे धोतर या पोषाखातील नवरदेवाला विविध फुलांच्या माळा घालण्यात आल्या आहेत . वधू अर्थात रुक्मिणी माता देखील पांढऱ्या रंगाच्या पैठणीत सजली आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट , गळ्यात फुलांच्या दागिन्यात रुक्मिणी मातेचे रूप उठून दिसत आहे . वधू वरांच्या अंगावर केशर पाणी व गुलाल शिंपडून लग्नाला सज्ज करण्यात आले आहे.
शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बारा वाजता पार पडणार विवाह सोहळा
भागवत कथाकार अनुराधा शेटे यांचे माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेले कृष्ण अवताराच्या कथेचा आज रुक्मिणी पाणिग्रहण आणि कृष्ण विवाह सोहळ्यपर्यंत आल्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती विठ्ठल सभा मंडपात अर्थात लग्नाच्या मांडवात आणण्यात येतील . देवाचा स्वर्गीय विवाह सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बरोबर बारा वाजता संपन्न होईल .
हे ही वाचा :
पंढरपूरच्या कृष्णाचा गिनीज बुक रेकॉर्ड! गीतेचे 700 श्लोक तोंडपाठ; केवळ 51 मिनिटांत पठण करणार