Solapur : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडॉऊनचा अनेकांनी सदुपयोग केला. काहींनी घरी बसून पाककृती शिकल्या, तर काहींनी ऑनलाईन माध्यमातून अनेक कलाकुसर शिकून घेतल्या. अशीच काहीशी गोष्ट पंढरपुरात राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाने देखील आत्मसात केली. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळात या मुलाने गीतेचे (Geeta) 700 श्लोक पाठ केले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला देखील याची नोंद करण्यास भाग पाडलं. आता हे नेमकं झालं कसं? पाहूया.
लॉकडाऊनचा असा केला सदुपयोग
पंढरपूरमधील अनिल नगर भागात राहणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या कृष्णा शिंदेने लॉकडाऊनचा सकारात्मक उपयोग करुन घेतला, या काळात कृष्णाने संपूर्ण गीता मुखोदगत करून दाखवली आहे. एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर इवल्याशा कृष्णाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची संधी मिळवली आहे.
नऊ वर्षाच्या वयात पाठ केले गीतेचे श्लोक
कोरोना काळामध्ये सगळीकडेच लॉकडाऊन होता. संपूर्ण जग या काळात ठप्प झालेलं होतं. या दोन वर्षाच्या काळात त्या वेळी नऊ वर्ष वयाच्या कृष्णाने मोबाईल तसेच धार्मिक ग्रंथातून गीतेचे तब्बल सातशे श्लोक मुखोदगत केले होते. कृष्णाने हे सर्व श्लोक केवळ 55 मिनिट आणि 51 सेकंदामध्ये म्हणत एक विक्रम केला आहे.
गरिबी घराण्यातील पोरानं नाव कमावलं
कृष्णाच्या घरची परिस्थिती हलाखिची असून विठ्ठल मंदिरामध्ये त्याची आई देवाला नैवेद्य बनवण्याची सेवा करते, तर वडील मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढतात. अशात कृष्णाने कोरोना काळात मोबाईलवर लर्न गीता डॉट कॉम या संकेत स्थळावर जावून गीतेच्या श्लोकाचं शिक्षण घेतलं. लॉकडाऊन काळात कृष्णाने गीता शिकण्याचं काम केलं आणि आज केवळ 55 मिनिटांत तो संपूर्ण 700 श्लोक म्हणून दाखवतो.
नेमका गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत पोहोचला कसा?
कृष्णाची गीतेतील आवड पाहून उत्तरप्रदेशातील इस्कॉन गुरुकुलने त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली, येथेच कृष्णा सध्या शिक्षण घेत आहे. गीतेच्या श्लोक पाठांतराचा अगोदरच 73 मिनिटांचा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता. मात्र त्यापेक्षा कमी वेळात सर्व श्लोक म्हणण्याचा सराव कृष्णाने केला. सरावानंतर अवघ्या 55 मिनिट आणि 51 सेकंदात संपूर्ण भगवतगीता त्याने म्हणून दाखवली. त्याचा हा तयार केलेला व्हिडिओ त्याच्या आचार्यांनी वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवला होता. या व्हिडिओची दखल घेवून तेथील पदाधिकारी लवकरच इकडे येणार असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिली.
लवकरच जागतिक पातळीवर होणार कामगिरीची नोंद
आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मंडळी इथे येऊन त्याच्या या गीतापठण कामगिरीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहणार आहेत आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेणार आहेत. कृष्णाच्या मदतीला आता अनेकजण पुढे येऊ लागले असून गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी कृष्णाचे कुटुंब धडपडू लागले आहे.
हेही वाचा: