Shravan Somvar: श्रावण महिना म्हणजे शिवभक्तीचा महिना. श्रावण महिन्यातील सोमवाराचे हिंदू धर्मात विशेष महत्व. या दिवशी शंकराची पूजा केली जाते, उपास केले जातात. पण यंदाच्या श्रावण महिन्याचं काही विशेष महत्त्व असणार आहे. यंदाचा श्रावणाचा कालावधी हा तब्बल 59 दिवसांचा म्हणजे दोन महिन्यांचा असणार आहे. तसेच या वर्षीच्या श्रावण महिन्यात चार किंवा पाच नव्हे तर आठ सोमवार असतील. अधिक मासामुळे यंदा श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. 


अधिक मासामुळे यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात ही 18 जुलै रोजी होणार आहे. तर 14 सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याचा शेवट होणार आहे. उत्तर भारतात श्रावण महिना आपल्या आधी सुरू होतो. उत्तर भारतात श्रावणाची सुरुवात 4 जुलै रोजी होते आणि तो 31 ऑगस्टपर्यंत असेल.18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत मलमास अधिक असेल. म्हणजे या काळात शंकरासोबत विष्णूचीही पूजा करण्याचा लाभ मिळणार आहे. 


जाणून घ्या आठ सोमवार 



  • श्रावणाचा पहिला सोमवार: 24 जुलै

  • श्रावणाचा दुसरा सोमवार: 31 जुलै

  • श्रावणाचा तिसरा सोमवार: 7 ऑगस्ट

  • श्रावणाचा चौथा सोमवार: 14 ऑगस्ट

  • श्रावणाचा पाचवा सोमवार: 21 ऑगस्ट

  • श्रावणाचा सहावा सोमवार: 28 ऑगस्ट

  • श्रावणाचा सातवा सोमवार: 4 सप्टेंबर

  • श्रावणाचा आठवा सोमवार: 11 सप्टेंबर


प्रमुख सणांच्या तारखा


श्रावण अधिमासमुळे विविध सणांच्या तारखांमध्ये बदल होणार आहेत. व्रताची पौर्णिमा 1 ऑगस्ट 2023 रोजी असेल. संकष्टी चतुर्थी 4 ऑगस्ट 2023, पुरुषोत्तम महिना 16 ऑगस्ट रोजी संपेल. व्रताची पौर्णिमा, यजुर्वेदीयांचे उपकर्म, रक्षाबंधन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. ऋग्वेदाचे उपकर्म 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. 


आषाढ पौर्णिमेच्या एक महिन्यानंतर रक्षाबंधन येते. यंदा 2 महिन्यांनंतर 30 ऑगस्टला रक्षाबंधन होणार आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी बहिणीला आषाढ पौर्णिमेनंतर दोन महिने वाट पाहावी लागेल. 


श्रावणात शिवपूजेला मोठं महत्व


श्रावणात सोमवाराला अत्यंत महत्व असते.  शिवपूजनासाठी हा दिवस खास मानला जातो. या दिवशी शिवाची पूजा करण्याने शिव प्रसन्न होतो असं म्हणतात. सोमवारी शिवपूजा करणे म्हणजे आयुष्यात येणारे सर्व त्रास दूर केले जाते. या दिवशी विधीवत भगवान शिवची पूजा केल्यास घरातील नकारात्मक उर्जा दूर होण्यास मदत होते. या दिवशी अभिषेक केल्याने भगवान संतुष्ट होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असं पुराणात सांगितलं आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)