Shardiya Navratri 2023 : नवरात्रौत्सवाला (Navratri 2023) अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे. त्यानुसार कन्या पूजन देखील नवरात्रीत केलं जातं. कन्या पूजन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केलं जातं. या दिवशी देवीचा उपवास करणारे भक्त घरोघरी कुमारिका कन्यांना बोलावून त्यांना जेवू घालतात. खरंतर, मुलींना देवीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्या पूजन दरम्यान नऊ मुली असणे आवश्यक आहे. दरम्यान, जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते असं म्हटलं जातं.
या संदर्भात ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितले की, नवरात्रीमध्ये कन्या पूजेला खूप महत्त्व आहे. साधारणत: नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना जेवण दिले जाते. पण काही भाविक अष्टमीलाही कन्यापूजन करतात. नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना भोजन देण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, वय 2 ते 10 वर्ष वयोगटातील नऊ मुलींना भोजन दिल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात.
मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा आणि देवीला अर्पण केलेल्या वस्तूही देवीला अर्पण कराव्यात. त्यानंतर मुलीची पूजा केली जाते.
मुलींची आणि देवीच्या शस्त्रांची पूजा
अष्टमीला देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करावी. या तिथीला पूजा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य देऊन हवन करावे. याबरोबरच 9 मुलींना घरी बोलावून अन्नदान करावे. दुर्गाष्टमीला दुर्गा देवीला विशेष प्रसाद द्यावा. पूजेनंतर रात्री जागरण करून भजन, कीर्तन, नृत्य करून हा उत्सव साजरा करावा.
जर तुम्ही बेरोजगारीने त्रस्त असाल तर सहा वर्षाच्या मुलीला छत्री आणि कपडे भेट द्या. पाच ते 10 वर्षे वयोगटातील मुलींना दूध, पाणी किंवा फळांचा रस यांसारखे अन्नपदार्थ दिल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
कन्या भोजनाचे महत्त्व पुराणात आहे
ज्योतिषाने सांगितले की, प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारीका पूजन करणं आवश्यक आहे. कारण कन्येची पूजा केल्याशिवाय भक्ताचे नवरात्रीचे व्रत अपूर्ण मानले जाते. कन्यापूजेसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथी योग्य मानली जाते. दहा वर्षापर्यंतच्या मुली कन्याभोजसाठी योग्य आहेत.
'अशी' पूजा करा
कन्यापूजेच्या दिवशी घरी येणाऱ्या मुलींचे खऱ्या मनाने स्वागत केले पाहिजे, असे ज्योतिषाने सांगितले. यामुळे देवी प्रसन्न होते. यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे भक्ताच्या पापांचा नाश होतो. यानंतर सर्व नऊ मुलींच्या चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे भक्ताची प्रगती होते. पाय धुतल्यानंतर मुलींना स्वच्छ आसनावर बसवावे. सर्व मुलींच्या कपाळावर कुंकू लावावा. मुलींना जेवण देण्यापूर्वी देवीला नैवेद्य अर्पण करा, नंतर सर्व मुलींना जेवण द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या