Safala Ekadashi 2024 : संपूर्ण वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं महत्त्व असतं. आज 7 जानेवारीला (रविवार), पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी आहे, ज्याला सफला एकादशी असंही म्हणतात. 2024 मधील ही पहिली एकादशी (Ekadashi) आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सफला एकादशीचं व्रत केल्यास जीवनात यश मिळतं. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते. या एकादशीचे व्रत केल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात. विष्णूची पूजा आणि व्रत करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
सफला एकादशी व्रत मुहूर्त
पंचांगानुसार, सफला एकादशी तिथी 7 जानेवारीच्या मध्यरात्री 12:41 वाजता सुरू झाली आहे. 8 जानेवारी रोजी मध्यरात्री 12:46 वाजता एकादशी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार सफला एकादशीचे व्रत 7 जानेवारीला आहे. सफला एकादशीला आज दिवसभर पूजा करता येते. सफला एकादशी व्रत सोडण्याची वेळ 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 6.57 ते 09:03 वाजेपर्यंत आहे.
सफला एकादशीचे महत्त्व
सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते. पौराणिक मान्यतेनुसार, जो कोणी भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा आणि भक्ती करतो, त्याला मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते. या व्रताचे पालन केल्याने जीवनातील सर्व दुःखं संपतात आणि व्यक्तीचे नशीब उजळतं. या दिवशी विधिवत पूजा करण्याने आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळते आणि आपली सर्व कार्ये निर्विघ्न पार पडतात, अशी मान्यता आहे.
सफला एकादशी पूजा पद्धत
सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात पूजा करावी. उपवासाचा संकल्प घ्यावा. चौरंगावर लाल वस्त्रावर भगवान विष्णूंचा फोटो ठेवा. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. फूल,फळ,धूप, दिवा लावून देवाला नैवेद्य अर्पण करा. आरती करुन कथा पठण करा. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा उच्चार करा.
सफला एकादशीचे नियम
सफला एकादशीच्या व्रतामध्ये काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी दिवसभर अन्न सेवन करू नये, तुम्ही फक्त फलाहार करू शकतात. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी चुकूनही भाताचे सेवन करू नये. सफला एकादशीच्या दिवशी कोणतेही फूल किंवा पान तोडणे अशुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला पुन्हा विष्णूची पूजा करावी. पूजेनंतर गरजू लोकांना अन्नदान करा आणि उपवास सोडा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: