Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. 


श्रावण महिना सुरु होताच अनेक सणांची चाहूल लागते. या महिन्यात रक्षाबंधनबरोबरच अनेक सण साजरे केले जातात. आपल्या जनावरांना सजविण्यापासून दर्याराजाला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करण्यापर्यंत अनेक अर्थाने हा दिवस खास असतो. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा दिवस कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊयात. 


नारळी पौर्णिमा : महाराष्ट्र


श्रावण पौर्णिमेचा दिवस हा समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचा सण आहे. हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.


रक्षाबंधन


श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमाही असते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या परंपरेला रक्षाबंधन म्हणतात. रक्षाबंधन हा मूळ उत्तरी भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.


अवनी अवित्तम (Avani Avittam) : तामिळनाडू आणि केरळ


दक्षिण भारतातील अनेक भागांत रक्षाबंधनचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात नाही. तमिळनाडू आणि केरळ सारखी राज्ये अवनी अवित्तम म्हणून हा दिवस साजरा  करतात. हा सण कुटुंबातील पुरुष सदस्यांना समर्पित आहे. श्रावण महिन्याला पौर्णिमा आल्याने, लोक आपल्या पापाची क्षमा मागून पाण्यात डुबकी मारून शुद्धीकरणाची विधी करतात. त्यानंतर, जुन्या धाग्याच्या जागी 'जनेऊ' नावाचा पवित्र धागा बांधला जातो. हा धागा नूतनीकरणाचे प्रतीक आहे. तसेच येणाऱ्या वर्षात पुण्यपूर्ण करण्याचे वचन या माध्यमातून दिले जाते. या महत्त्वपूर्ण दिवशी, असे मानले जाते की, विद्वान यजुर्वेद पठण सुरू करतात, ही प्रथा पुढील सहा महिने चालू राहते.


गम पौर्णिमा : ओदिशा


ओदिशात गम पौर्णिमा, गाई आणि बैल यांसारख्या जनावरांप्रती साजरा करण्याचा दिवस आहे. हा दिवश अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. स्थानिक लोक गमहा दीन या उत्साहात मग्न झालेले दिसतात. तसेच, हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाचा जन्मदिवस देखील साजरा केला जातो.


लुंबा राखी (Lumba Rakhi) : राजस्थान


राजस्थानमध्ये लुंबा राखी म्हणून ओळखली जाणारी अनोखी राखी साजरी केली जाते. बहिणी भावांना राख्या बांधण्याच्या सामान्य उत्तर भारतीय प्रथेबरोबरच, मारवाडी आणि राजस्थानी समुदाय मुलींना त्यांच्या भावांच्या पत्नींना राख्या बांधून हा दिवस साजरा करतात. हा दिवस पती- पत्नीच्या नात्यातील विश्वासाला आणि अतूट बंधाला समर्पित आहे.  


महत्त्वाच्या बातम्या :


Shravan 2023 : आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती