पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात गणपती मूर्तींचं वाटप केलं. मागील तीन वर्षांपासून गणेशोत्सवाच्या पूर्वी गणपती मूर्तींचं वाटप करण्यात येतं. त्यांनी प्रतिनिधीक स्वरुपात पाच मूर्तींचं वाटप केलं मात्र गणपती मूर्ती वाटपाच्या उपक्रमाअंतर्गत यंदा 7 हजार 500 गणेश मूर्तींचं वाटप करण्यात येणार आहे.
सध्या सगळीकडे सुंदर रंगांनी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तींची किमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची मूर्ती हवी. या गोष्टींचा विचार करत पुण्यातील प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे 'मूर्ती आमची किंमत तुमची' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठेत हा उपक्रम राबविला आहे. उपक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गणरायाची आरती करुन झाली. त्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात पाच नागरिकांना गणेश मूर्ती देण्यात आल्या.
यंदा 7 हजार 500 गणेश मूर्ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे. साईनाथ चकोर, हेमंत कंठाळे, नरेश देवकर, जीवन गायकवाड, विक्रम लगड, गौरव गवळी, भाई कात्रे, श्रीराज पवार, विकास गवळी यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
कोविड काळापासून 'मूर्ती आमची किंमत तुमची' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हल्ली गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांना या मोठ्या मूर्ती घेणे शक्य होत नाही, पण मोठ्या मूर्ती घेण्याचा मुलांचा हट्ट असतो. यामुळे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोणाकडे पैसे नसतील तर विनामूल्य मूर्ती देखील देण्यात येते, असं हा उपक्रम सुरु करणारे प्रल्हाद गवळी यांनी सांगितलं.
101 विद्यार्थ्यांनी साकारलं राज ठाकरेंचं चित्र
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळेच्या 101 विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांचे लाईव्ह चित्र यावेळी काढले. यावेळी आदिमाया ढोल ताशा पथक लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या पथकाने वादन केले.
इतर महत्वाच्या बातम्या: