जालना : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्या प्रकरणातील (Kopardi Rape Case) आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. आज पहाटेच्या सुमारास स्वत:च्या कपड्याने त्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान, यावरच जालना येथील अंतरवाली गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. सरकारने फाशी दिली नाही, पण देवाने न्याय केला असल्याचं जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या बाहेर करण्यात आलेल्या हल्ल्यातील आरोपींमध्ये जरांगे यांचे देखील नाव होते. 


कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याच्या घटनेवर बोलताना जरांगे म्हणाले की, आज देवाने न्याय दिला आहे. कारण ज्यावेळी ही घटना घडली होती, त्यावेळी सर्वच जाती-धर्माचा माणूस एकवटला होता. या आरोपींचं कोणीच समर्थन केले नव्हते आणि यांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. त्यामुळे आज सर्वांचीच इच्छा पूर्ण झाली आहे. 


आज देवाने न्याय केला असून, पापाने दम धरला नाही. आपण केलेलं कृत्य खूप वाईट असल्याचा त्यांना पश्चाताप झाला असेल. पण शेवटी देवानेच त्यांचा न्याय केला. सरकारने आमच्या ताईला न्याय नाही दिला, पण देवाने न्याय दिला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


आमची 'ती' मागणी अजूनही प्रलंबित...


इतर आणखी दोन आरोपी आहेत. मात्र, न्यायालयात हवा तसा खटला चालत नसून, याबाबत अनेकदा सरकारला निवेदन दिले आहेत. 23 फेब्रुवारीला बैठक झाली, त्यावेळी देखील सरकारने आदेश काढले होते. मी त्यांच्या पाठीमागे लागलो होतो की, सरकारला फक्त एक पत्र द्यायचे होते. त्यामुळे कोर्टात ती केस उभी राहिली असती. आमची तेव्हा ती केलेली मागणी अजूनही तशीच आहे. त्यामुळे सरकारने तातडीने तो खटला न्यायालयात दाखल करुन त्वरित आरोपींना फाशी द्यावी असे जरांगे म्हणाले. 


काय आहे कोपर्डी प्रकरण? 



  • 13 जुलै 2016 रोजी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.

  • नोव्हेंबर 2017 मध्ये जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष मवाळ यांना दोषी ठरवण्यात आले.

  • जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा आणि उर्वरित दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  • फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जितेंद्र शिंदेकडून मुंबई हायकोर्टात अपील करण्यात आलं.

  • जितेंद्र शिंदेच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरुच आहे.

  • सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी मागणीसाठी कोपर्डी ग्रामस्थांनी उपोषण केले होते.

  • 10 सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या, पहाटेच्या सुमारास गळफास घेत संपवलं जीवन