नागपूर : विदर्भाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव (Marbat Festival) आज मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळपासून पडणारा संततधार पाऊस ही या उत्सवाच्या उत्साहाला कमी करु शकला नाही. भर पावसात नागपूरकरांनी ईडा पीडा रोगराई घेऊन जा गे मारबतच्या घोषात ऐतिहासिक मारबत मिरवणूक काढली. नागपुरातील (Nagpur) मारबत उत्सवाला 143 वर्षाची परंपरा आहे. 1881 मध्ये मस्कासाथ भागातून काळी मारबतीची परंपरा सुरु झाली होती तर 1885 पासून जागनाथ बुधवारी भागातून तेली समाजाकडून दर वर्षी पिवळी मारबतची मिरवणूक काढली जाते. आजही परंपरेनुसार दोन्ही मिरवणुका स्वतंत्ररित्या निघाल्या आणि नेहरु चौक परिसरात एकत्रित आल्या. या ठिकाणी हजारो नागपूरकरांनी मोठ्या श्रद्धेने दोन्ही मारबतला नमन केले आणि एकत्रित मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून गेली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागपूरकरांनी मारबतीचे दर्शन घेत शहरातील ईडा, पीडा, रोगराई, संकटे, अनिष्ट चाली रीती नष्ट करण्याची प्रार्थना केली. मोठ्या संख्येने लहान मुलांना मारबतीचे स्पर्श केले. संध्याकाळच्या सुमारास शहराच्या वेशीवर दोन्ही मारबतचे दहन केले जाते. 


मारबतसोबत समाजातील सर्व नकारात्मकताही नष्ट होते अशी लोकांची भावना आहे. आजच्या मारबत मिरवणुकीत अनेक बडगे ही पाहायला मिळाले. मात्र, सर्वांचं लक्ष उदयनिधी स्टॅलिन यांच्या प्रतिकात्मक बडग्याने वेधलं. सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनच्या बडगा शहरभर फिरवण्यात आला. याशिवाय महागाई, भ्रष्टाचार, महापालिकेच्या भोंगाडे कारभाराचा बडगाही काढण्यात आला. स्त्री विषयक कायदे अनावश्यक पद्धतीने पुरुषांच्या विरोधात असल्याचा कारण पुढे करत पुरुषांच्या संघटनेने भुरी मारबत काढून स्त्रियांना अनावश्यक मदत करणाऱ्या कायद्यांचा निषेध दर्शवला. 


मारबत उत्सवाचे पौराणिक महत्त्व काय?


भगवान श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंस मामाने पुतना मावशीला पाठवले होते. विषारी दूध पाजतानाच श्रीकृष्णाने पुतना राक्षसीनीचा वध केल्यानंतर तिच्या मृतदेहाची लोकांनी धिंड काढून घरातील टाकावू वस्तू व पळसाच्या झाडाच्या फांदीद्वारे (मेढे) 'रोगराई, ईडा पीडा घेऊन जाय गे मारबत, अशा घोषणा देत गावाबाहेर मृतदेह जाळला होता, अशी अख्यायिका आहे. मान्यता आहे की तेव्हापासूनच पोळ्याच्या पाडव्याच्या पहाटेस पुतना मावशीचे प्रतीक म्हणून मारबत काढण्यात येऊन गावाच्या वेशीबाहेर जाळावीय त्यामुळे सर्व ईडा पीडा रोगराई आणि अनिष्ट चालीरीती दूर होतात. 


काळ्या मारबतीचे ऐतिहासिक महत्व काय?


स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांनी जनता त्रस्त झाली होती. त्यावेळी नागपूरकर जनता इंग्रजांविरोधात संघर्ष करत असताना भोसले घराण्यातील बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. या बाकाबाईचा निषेध करण्यासाठी 1881 पासून बाकाबाईचा पुतळा तयार करुन काळी मारबत काढण्यात येते. इतवारी परिसरातील नेहरु पुतळ्यापासून या काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. 1942 मध्ये मारबतीच्या उत्सवाच्या काळात इतवारी परिसरात दंगल झाली होती. 5 जण गोळीबारात ठार झाले होते मात्र तरीही मारबतीची मिरवणूक काढण्यात आली होती.


पिवळ्या मारबतीचे ऐतिहासिक महत्त्व काय?


पिवळ्या मारबतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेली समाजाकडून 1885 साली जागनाथ बुधवारीमध्ये पिवळी मारबत उत्सवाला सुरुवात करण्यात आली. तेव्हा इंग्रजांच्या विरोधात अनेक मुद्द्याना घेऊन लोकाना एकत्रित आणत या मारबतीची मिरवणूक काढली जायची. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या पिवळ्या मारबतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून अनिष्ट चालीरिती, ईडा पीडा यावर भाष्य होऊ लागले.


बडगे म्हणजे काय?


मारबत उत्सवाचा एक मुख्य आकर्षण म्हणजे बडगे. बडगे म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यावंवर टीका करणारे पुतळे. त्या त्या वर्षी समाजापुढे ज्या समस्या असता ज्या काही महत्वाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्दे आणि प्रश्न असतात, त्यावर समाजाच्या वतीने हे बडगे काढून टीका केली जाते.