Makar Sankranti 2024 : प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशीपरिवर्तन होते, त्यासा संक्रांत असे म्हणतात. वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात, अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात 1 संक्रांत असते. परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यामुळे या सणाला मकर संक्रांती (Makar Sankranti) म्हटले जाते. नवीन वर्ष 2024 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी (सोमवार) साजरी केली जाईल. शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते.


मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त


2024 या वर्षात मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीलाच साजरा केला जात आहे. मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल.


मकर संक्रांती शुभ योग


मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत वरियान योग राहील. याशिवाय या दिवशी रवि योगही तयार होत आहे. ससकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत रवि योग असेल. या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते, असे सांगितले जाते.


सूर्य मकर राशीत कधी जाणार?


15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे, त्यावेळीच सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील, याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 7:15 ते 9:00 पर्यंत आहे.


मकर संक्रांतीला शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास 31 मिनिटांचा असेल. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे.


मकर संक्रांतीची पूजा पद्धत


येत्या सोमवारी, म्हणजेच 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी, त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे, त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे, त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा. पूजेच्या वेळी सूर्य चालिसाचे पठण करावे. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करा. जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा. पूजा झाल्यावर दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Vakri 2024: शनि कुंभ राशीत चालणार उलटी चाल; 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब चमकणार, मिळणार सकारात्मक परिणाम