Ganeshotsav 2023 : देशात गणेशोत्सव (Ganeshotsav) दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. कधी एकदा बाप्पाचे (Shri Ganesh Chaturthi 2023) आपल्या घरी आगमन होते, याकडे लहान मोठे असे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वच आतूर झालेले दिसून येतात. असं म्हणतात, जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. गणेश चतुर्थीला बाप्पाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक भावना आहे. यंदाचीही गणेश चतुर्थी भाविकांसाठी तितकीच खास असणार आहे. जाणून घ्या बाप्पाच्या मूर्तीच्या  प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त तसेच पौराणिक महत्त्व... 


पंचांगानुसार शुभ मुहूर्त


भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या वर्षी गणेश चतुर्थी कधी आहे? याचा शुभ मुहूर्त काय? तसेच प्राणप्रतिष्ठेबद्दल जाणून घ्या. पंचांगानुसार, यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून ते 28 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल. यावेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.39 वाजता सुरू होईल, मात्र तिचा उदय 19 सप्टेंबर रोजी होईल. तर 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन असेल


गणेश चतुर्थीची सुरूवात आणि समाप्ती तारीख : 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.39 वा. तर 19 सप्टेंबर 2023 दुपारी 1.43 वाजता
प्राणप्रतिष्ठेची शुभ वेळ : 19 सप्टेंबरला सकाळी 11:07 ते दुपारी 01:34


ज्ञान, यश, बुद्धीची देवता


पौराणिक माहितीनुसार, भगवान श्रीगणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला स्वाती नक्षत्र आणि सिंह राशीत मध्यान्न काळात झाला असे मानले जाते. त्यानुसार यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाचा संबंध ज्ञान, बुद्धी यांच्याशी आहे. विघ्ननाशक, शुभ, यश आणि समृद्धी देणाऱ्या बाप्पाची मनापासून पूजा-अर्चना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये किंवा दुकानात गणपतीची मूर्ती योग्य पद्धतीने स्थापित केल्यास घरात सुख-समृद्धी कायम राहते.


गणेश चतुर्थी पौराणिक कथा


गणेश चतुर्थी संबंधित एक पौराणिक कथा खूप लोकप्रिय आहे. शिवपुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या अंगाला लावलेल्या हळदीच्या मदतीने एक पुतळा तयार केला. त्यानंतर त्या पुतळ्यात प्राण फुंकले. अशा प्रकारे बालगणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने आंघोळीला जात असल्यास कोणालाही आत येऊ देऊ नये, अशी बालगणेशाला आज्ञा केली. गणेश दारात पहारा देत  असतानाच भगवान शंकरांचे आगमन झाले. गणेशाने शंकरांना ओळखले नाही, त्यावेळी आईची आज्ञा असल्याने गणेशाने शंकराला आत जाण्यास नकार दिला. यावर शंकराने क्रोधित होऊन गणेशाचे डोके त्रिशूलाने धडा वेगळे केले. बाहेर गोंधळ निर्माण झाल्यानंतर पार्वती बाहेर आली आणि आक्रोश करू लागली. त्यांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. तेव्हा भगवान शंकराने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, तिच्या बाळाचे डोके आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचे डोके आणले. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडले. त्यात त्यांनी प्राण फुंकले. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे शीर मिळाले.


जाणून घ्या, पूजेची पद्धत


श्रीगणेशाचे स्मरण करताना सर्वप्रथम गणेश मंत्राचा जप करावा.
त्यानंतर चौरंग ठेवावा, आणि गणेशमूर्तीवर पाणी शिंपडावे.
पूजेच्या साहित्यात हळद, तांदूळ, चंदन, गुलाल, शेंदूर, दुर्वा, जानवे, पेढे, मोदक, फळे, हार, फुले यांचा समावेश करावा.
गणपतीच्या पूजेसाठी तयार केलेले सर्व साहित्य अर्पण करा.
यानंतर श्रीगणेशासह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी.
त्यानंतर बाप्पाची विधीवत पूजा करा. 
आरतीनंतर नैवेद्य अर्पण करा.
सकाळ, संध्याकाळ गणेशाची आरती करा