नाशिक : राज्यात सर्वत्र देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास (Navratri 2023) भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.या नवरात्रोत्सव काळात देवीच्या विविध शक्तिपीठांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील चांदवड येथील प्रसिद्ध देवस्थान राजराजेश्र्वरी कुलस्वामिनी स्वयंभू श्री.रेणुका माता मंदिरात देखील लाखो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होत असते. पा
पुण्यनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळे व शक्तिस्थाने आहेत.त्यापैकीच एक म्हणजे चांदवड येथील प्रसिद्ध देवस्थान राज राजेश्वरी कुलस्वामिनी स्वयंभू, प्राचीन व जागृत असलेली श्री. रेणुका माता... श्री रेणुका मातेचे हे मंदिर चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई - आग्रा महामार्गा शेजारील सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत निसर्गरम्य परिसरातील एका टेकडीच्या गुहेत वसलेले आहे.देवीच्या साडे तीन खंडपीठापैकी अर्धेपीठ म्हणून या देवस्थानची ओळख आहे.
काय आहे अख्यायिका?
श्री.जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वताच्या आईचे शीर धडा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते. त्यावेळी देवीच्या धडाचा भार माहूर (ता. किनवट जी. नांदेड) येथे असून शीर चांदवड येथे आहे. त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून प्रसिध्द असलेली जगतजननी, चांदवड निवासीनी राजराजेश्वरी, कुलस्वामिनी श्री रेणुकामाता म्हणून ओळखले जाते.
पालखीची परंपरा
ब्रिटीश कालीन सरकारच्या ताब्यात असलेल्या या पुरातन कालीन मंदिराचा जीर्णोधार पुण्यश्लोक देवी श्री.अहिल्याबाई होळकर यांनी सन 1735 ते 1795 या कालावधीत केला आहे. या मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभा मंडप, तीर्थ तलाव, आदीचे बांधकाम केले आहे. श्री.अहिल्याबाई होळकर या त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करत असे. हीच प्रथा अहिल्यादेवीनंतर होळकर घराण्याकडून होत आहे.सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालेतर्फे दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस व नवरात्रात दहा दिवस पालखी काढण्यात येते. या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुहासिनी आपापल्या घरापुढे मनोभावे पूजा करतात.
नाशिक जिल्हयातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिध्द देवस्थान असल्याने भाविक भक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी बाराही महिने वर्दळ असते. शारदीय नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची या मंदिरात प्रचंड गर्दी असते.
हे ही वाचा :