Dasara 2023 : दसरा किंवा विजयादशमी (Vijayadashami 2023) हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दसरा सण साजरा होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले. हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. या दिवशी रावण दहनासह देवी दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते. यंदा  दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी हवन करणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं. 


विजयादशमीचा मुहूर्त - दुपारी 02 वाजून 05 मिनिटे ते 02 वाजून 51 मिनिटांचा मुहूर्त हा शुभ आहे. हा 46 मिनिटांचा कालावधी हा पुजेसाठी देखील अत्यंत शुभ असल्याचं सांगितलं जात आहे. 


विजयादशमी 2023 पुजेचा मुहूर्त


24 ऑक्टोबर 2023 रोजी विजय मुहूर्त दुपारी 01.58 ते 02.43 पर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी पूजेची वेळ दुपारी 01.13 ते 03.28 पर्यंत आहे. या दोन शुभकाळातच शस्त्रपूजा केली जाते. तर श्रवण नक्षत्राचा प्रारंभ हा 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06 वाजून 44 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा शुभ काळ 23 ऑक्टोबर संध्याकाळी 05 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल. 


दसऱ्याच्या पुजेचा विधी


दसऱ्याची पूजा ही कायम अभिजीत, विजयी आणि अपराह्न या काळामध्ये केली जाते.  घरातील ईशान्य दिशेला दसऱ्याची पूजा करा. पुजेच्या ठिकाणी सर्वात आधी गंगेचं पाणी शिंपडून पवित्र करावे. देवी अपराजिताची पूजा करावी. त्यानंतर श्रीराम आणि हनुमानाची पूजा करावी. त्यानंतर आरती करुन प्रसादाचा नैवेद्य दाखवाव.. 


होम - हवन विधी


दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. अंघोळ करुन स्वच्छ करुन चांगले कपडे परिधान करावे. शास्त्रानुसार होम हवन करण्यासाठी पती आणि पत्नीने बसावे. स्वच्छ जागेवर हवन कुंड ठेवावे. हवन कुंडामध्ये आंब्याच्या झाडाची लाकडं आणि कापराचा वापर करुन हवन पेटवावा. त्यानंतर हवन कुंडात सर्व देवी देवतांच्या नावाने आहुती द्यावी. धार्मिक मान्यतेनुसार कमीत कमी 108 वेळा आहुती द्यावी. हवन पूर्ण झाल्यानंतर आरती करुन नैवेद्य दाखवाव. या दिवशी कन्या पुजनाला देखील विशेष महत्त्व आहे. 


हवनासाठी लागणारे साहित्य


आंब्याच्या झाडाची लाकडं, बेलाची पानं, आंब्याची पानं, चंदनाची लाकडं, तिळ, कापूर, लवंग, तांदूळ, तूप, साखर, वेलची, नारळ, सुपारी, खाऊची पानं, बत्ताशे, सुपारी, अश्वगंधा, ज्येष्ठमध हे साहित्य हवन करण्यासाठी आवश्यक आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Dasara 2023 : दसऱ्याचा दिवस शुभ कार्यांसाठी उत्तम! चुकूनही 'हे' काम करू नका, तारीख, महत्त्व जाणून घ्या