Champa Shashthi 2023 :  मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो.  खंडोबा ज्यांचा कुलदेव आहे. त्यांच्या घरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने नवरात्र साजरी केली जाते. याविषयी ज्येष्ठ पंचागतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिलेली माहिती जाणून घेऊ.


खंडोबाच्या महानैवेद्याचे महत्त्व


चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. त्यात ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात. ठोंबरा हे नाव काहींना अपरिचित वाटेल. जोंधळे शिजवून त्यात दही, मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोंबरा म्हणतात. तसेच गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात. त्यात फुलवात लावतात. 


तळी भरण्याचे महत्त्व


महानैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. एका ताम्हनात पाने, पैसा, सुपारी, भंडार व खोबरे हे पदार्थ ठेवून येळकोट असा उद्घोष करून ते ताम्हन तीनदा उचलणे यालाच ‘तळी भरणे’ म्हणतात. ताम्हण उचलताना प्रत्येकवेळी भंडार भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. मग दिवटी बुधली घेऊन आरती करतात. मग जेजुरीच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व भंडार उधळून पुनश्च जागेवर येतात. लाक्षणिक अर्थाने याला ‘जेजुरीला जाऊन येणे’ असे म्हणतात. नंतर दिवटी दुधाने विझवतात.



मणि आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव 


मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. मणि आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण रहावे म्हणून चंपाषष्ठीला हा उत्सव साजरा करतात. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्त होतो. या नवरात्रात घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा, मल्लारी माहात्म्याचा पाठ, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन, वाघ्या-मुरळी भोजन , भंडार (हळद) उधळणे इत्यादी गोष्टी करतात. कुत्रा हे खंडोबाचे वाहन असल्यामुळे त्यालाही खाऊ घालतात.


 


मल्लारी मार्तंड


खंडोबा मल्लारी, मल्लारिमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ इत्यादी नांवांनी ओळखला जातो. खंडोबाइतके महाराष्ट्रात कोणतेही लोकप्रिय दैवत नाही. खंडोबावरची मालिकाही लोकप्रिय झाली होती. खंडोबाची एकूण बारा स्थाने आहेत. 
(1) जेजुरी-पुणे 
(2) निंबगाव -पुणे 
(3) पाली पेंबर -सातारा 
(4) नळदुर्ग-धाराशिव 
(5) शेंगुड-नगर 
(6) सातारे-औरंगाबाद 
(7) माळेगाव-नांदेड 
(8) मैलारपू पेंबर-बिदर
(9) मंगसुळी-बेळगाव 
(10) मैलारलींग-धारवाड 
(11) देवरगुड-धारवाड 
(12) मण्मैलार-बेळुळारी, 


खंडोबाच्या चार आयुधांपैकी खड्.ग हे विशेष महत्त्वाचे


कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सांस्कृतिक अनुबंधाचे हे एक प्रकट प्रतीक आहेत. मल्लारिमाहात्म्य नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथामध्ये खंडोबाच्या चरित्राची कथा आहे. खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांची कथा तुम्ही पाहिली असेलच. खंडोबाच्या चार आयुधांपैकी खड्.ग हे विशेष महत्त्वाचे आहे. या खड्.गाला ‘खांडा’ म्हणतात. खांडा ज्याच्या हाती आहे तो खंडोबा असे नाव रूढ झाले. खंडोबा हा मूळचा ऐतिहासिक वीर पुरुष होता आणि त्यालाच देवरूप आले असेही सांगण्यात येते.


भंडाऱ्याचे महत्त्व


खंडोबाच्या उपासनेत भंडारला फार महत्त्व आहे. हळदीच्या चूर्णाला 'भंडार' म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या जत्रेत भंडार उधळतात. भक्त भंडार मस्तकाला लावतात. खंडोबाची उपासना कर्नाटकमधून महाराष्ट्रात आली असेही संशोधकांचे मत आहे. इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या पूर्वींपासून खंडोबाच्या मूर्ती अस्तित्त्वात असल्याचेही संशोधकांचे मत आहे.


चंपाषष्ठी व्रत तिथी


पंचागानुसार 17 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील संध्याकाळी 05.33 वाजता प्रारंभ होईल. 18 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 03.13 वाजता संपेल.


सकाळी 07.07 ते सकाळी 8.25
सकाळी 09.42 ते सकाळी 11 वाजता


चंपाषष्ठी व्रत योग


सोमवारी, 18 डिसेंबर 2023 ला चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जाईल. चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. रविवारी किंवा मंगळवारी षष्ठी शतभिषा नक्षत्र आणि वैधृति योग सोबत होणार संयोग अंत्यत शुभ मानला जाणार आहे


 


चंपाषष्ठीची आख्यायिका


पौराणिक कथेनुसार, मणिसुर आणि मल्लासुर या दोन राक्षसांनी मानव, देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. असुरांचा त्रास असहय्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकराचा धावा केला. त्यानंतर भगवान शंकराने भगवान खंडोबाचे रूप धारण केले, त्यानंतर मणि आणि मल्ल यांच्या सोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले. हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. असुरांवरील विजयाचा आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्ठी ही धार्मिक दृष्ट्या साजरी केली जाते.


सहा दिवस तेलाचा दिवा


चंपाषष्ठीला विशेष महत्त्व असून या दिवशी खंडेरायाची पूजा केली जाते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव साजरा केला जातो. अमावास्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात. त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


2024 Astrology : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? न्यू ईयर होणार हॅप्पी हॅप्पी! ज्योतिषशास्त्रानुसार वार्षिक राशीभविष्य जाणून घ्या