Sant Muktabai Palkhi: मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेल्या संत मुक्ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोहोचली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान ही पालखी पंढरपुरात पोहोचताच वरुणराजाने पर्जन्यवृष्टीने तिचं स्वागत केलं. 


आषाढी महासोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पहिला मानाचा पालखी सोहळा पंढरीत दाखल झाला आहे. सर्वच पालखी सोहळे वारकरी संप्रदायाची पूजनीय असले तरी मानाच्या समजल्या जाणाऱ्या सात पालख्यातील संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा आज तीनच्या सुमारास पंढरपूर मध्ये दाखल झाला. वरुणराजाने जोरदार पर्जन्यवृष्टी करीत  आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या सोहळ्याचे स्वागत केले. तापी तीरावरून आलेला या पालखी सोहळ्याने गेल्या 24 दिवसात जवळपास 600 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. यंदा या पालखी सोहळ्याने वाट सरळ करताना 11 दिवसांचा आणि 150 किलोमीटरचे अंतर कमी केल्याने वारकऱ्यांना प्रवास सुसह्य झाला .


दरवर्षी संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात पहिल्यांदा पोहोचते. त्यानंतर संत नामदेवांची पालखी आणि मुक्ताबाईच्या पालखीकडून इतर मानाच्या पालखींचे पंढरपूरच्या वेशीवर स्वागत केलं जातं.


संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी. संत मुक्ताबाई  पालखी सोहळ्यात 1200 महिला आणि 1000 पुरुष भाविक सामील झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत. पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करीत हे भाविक आज पंढरपूरमध्ये पोचले. संत मुक्ताबाई या संत  नामदेवांचे आजेगुरु असल्याने या पालखी सोहळ्याच्या स्वागताला संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराज पोचले होते. या स्वागतानंतर मुक्ताबाई यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून पालखी सोहळा त्यांच्या दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावला .


वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर


उद्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह अनेक पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखीतळावर येत असून जवळपास 14 ते 15 लाखांचा समाज याठिकाणी जमणार आहे.दोन दिवस हे वारकरी इथे असून 28 जून रोजी सायंकाळी ते पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. दरम्यान वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. इथे 27 आणि 28 जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काळाच्या पाहणी दौऱ्यात डॉ. तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी रात्री याबाबत सर्व सूचना दिल्या आहेत. या महाआरोग्य शिबिराचे टी-शर्ट आणि फलकाचे अनावरण यावेळी त्यांनी केले. 


यात्रेत जवळपास 15 ते 16 लाख भाविकांच्या आरोग्य तपासणी होणार


पालखी सोहळे पंढरपुरात दाखल झाल्यावर 29 जून आणि 30 जून रोजी दर्शन रांग असणाऱ्या गोपाळपूर पत्रा शेडजवळ दुसरे महाआरोग्य शिबीर सुरु होणार आहे. याचवेळी साडेतीन लाख भाविकांच्या निवासाची व्यवस्था असणारे तिसरे आरोग्य शिबीर सोलापूर रोडवरील 65 एकराजवळ ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्याच्या सोबत आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या 463 दिंड्यांची तपासणी संपूर्ण मार्गावर झाली असून यातही लाखो वारकऱ्यांची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. संपूर्ण यात्रेत जवळपास 15 ते 16 लाख भाविकांच्या आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी औषध साठे, वैद्यकीय उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.