Ashadhi wari 2023 : पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा इंदापूरमध्ये संपन्न झाला. त्यासाठी या पालखीनं पहाटेच निमगाव केतकीतून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं सकाळी अकराच्या सुमारास इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालय प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथं मंडप उभारून रिंगणाची तयारी आधीच करण्यात आली होती. तुकाराम महाराजांचा आजचा मुक्काम इंदापूरमध्ये असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम बरड येथे असणार आहे.
तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदानं धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. इंदापूर परिसरातील शेकडो नागरिकांनी रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. संत तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम आज इंदापुरातच असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं फलटणहून बरडकडे प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज फलटणहून बरडकडे प्रस्थान ठेवलं. यावेळी फलटणवासियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला. अनेक फलटणवासियांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांचा पाहुणचार केला. कुटुंबियांप्रमाणे त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर रात्री वारकऱ्यांनी अनेक ठिकाणी भजनं केली आणि पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेकडे रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड येथे पालखीचं दर्शन घेणार आहे. त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री शंभूराज देसाई, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसलेदेखील उपस्थित असणार आहे.
वारकऱ्यांना पंढरीची आस...
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. सगळेच वारकरी पंढरीच्या वाटेने विठुनामाचा गजर करत एक एक पाऊल टाकत आहे.