Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांच्या जयघोषत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. बुधवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन झाले. यावेळी गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. 


सोलापूरचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गजानन महाराजांच्या पादुकाचे आशिर्वाद घेत पुष्पहार अर्पण करत स्वागत गेले. श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते. जवळपास 29 दिवसांचा पायी प्रवास करीत या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.


गजानन महाराजांच्या या पालखीसोबत सुमारे एक हजार वारकरी असून या पालखीचे सारथ्य मानाचे अश्व करीत आहे. त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. त्यानंतर टाळ वाजवीत आणि विठूरायचा जयघोष करत असलेले तरुण वारकरी देखील मोठ्या उत्साहात वारीत सहभागी आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे असलेल्या भाविकांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सप्तनिक आशीर्वाद यावेळी घेतले.


"श्री सिद्धेश्वरांच्या पावनभूमीत संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आज आगमन झाले. अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातून ही पालखी जिल्ह्यात प्रवेश करते. विधानसभेचा प्रमुख म्हणून मी या पालखीचे स्वागत केलं. गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. महाराजांच्या पादूकांचे दर्शन सोलापूर जिल्ह्यात घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले आम्ही स्वतःला परम भाग्यश्याली समजतो. गजानन महाराज आणि विठुरायाला रुसलेला वरुणराजा प्रसन्न होऊ दे हेच मागणं मागितलंय" अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.


तर "दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहात या पालखीचे स्वागत करत असतो. कित्येक वेळा पावसात भिजत आम्ही या पालखी सोहळ्यात सहभागी झालोय. पण यंदाच्या वर्षी कडक ऊन आहे, सगळीकडे कोरडं ठाक पडलंय. ही वारी पंढरपूरात पोहोचण्याआधी धो धो पाऊस पडावा आणि शेतकरी समाधानी व्हावा हीच पांडुरंग आणि गजानन महाराजकडे आमची प्रार्थना आहे." अशी प्रतिक्रिया भाजप नेते शहाजी पवार यांनी दिली. 


या पालखीच्या स्वागतला अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी पडदूने, तहसिलदार राजशेखर लिंबारे, तहसीलदार सैपन नदाफ यांच्यासह इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यानी देखील उपस्थित होते.