Ashadhi Wari 2023: संत एकनाथ महाराजांची पालखी (Sant Eknath Maharaj Palkhi) धाराशिव जिल्ह्यात आहे. दरम्यान संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे तिसरे रिंगण परंडा तालुक्यातील नांगरडोह या परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गेल्या अनेक दिवसापासूनची असलेली परंपरा अनुसार या परिसरातील भाजी भाकरीच्या उंबरा वर्गणीतून वारकऱ्यांना वनभोजनाची महापंगत गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली. या वनभोजनामुळे सोहळ्यातील वारकरी तृप्त झाले. 


श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा दहाव्या मुक्कामाचा टप्पा भूम तालुक्यातील दांडेगाव येथे पूर्ण करून अकराव्या मुक्कामासाठी प्रस्थान करत असते. परंपरेप्रमाणे देवगाव, खांडेश्वरीवाडी मार्गे दुपारी परंडा तालुक्यातील नांगरडोह येथे पालखी सोहळ्याचे तिसरे रिंगण सोहळा होतो. दरम्यान यंदाही पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली नांगरडोह येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील व आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या सजवलेल्या बैलगाडीतून येऊन सालाबादप्रमाणे या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. सोबतच नाथांच्या पवित्र पादुकाची "भानुदास एकनाथ" जय घोष करिता दर्शन घेतले.  


तिसरे रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने नांगरडोहाला जत्राचे स्वरूप निर्माण झाले होते. गावाचे जुने परंपरानुसार एक दिवस अगोदर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि पोलीस पाटील गाव दवंडी देऊन पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना महापंगत देण्यासाठी भाजी भाकरीची उंबरा वर्गणीतून एकत्र जमा करण्याचे आवाहन करतात. तर गावकऱ्यांच्यावतीने रिंगणाच्या ठिकाणी वनभोजन वारकऱ्यांना देण्यात आले. या वनभोजनामुळे सोहळ्यातील वारकरी तृप्त करून पंढरीच्या पुढील प्रस्थानासाठी पायी दिंडी सोहळा वाजत गाजत रवाना करण्यात आला.


पंढरपूर मंदिरात मानाचे स्थान... 


आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यभरातील पालख्या पंढरपूरला जातात. यात काही महत्वाच्या पालख्यांना मानाचे स्थान असते. दरम्यान पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीला पंढरपूरात विठ्ठलाच्या दरबारात तिसरे मानाचे स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी या पालखीत हजारो वारकरी सहभागी होत असतात. 


असे आहेत एकूण पाच रिंगण सोहळे 


पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर पाच 'रिंगण सोहळे' होणार आहेत. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडणार आहे. पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23 जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27 जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. 2 जुलै रोजी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करुन पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार असल्याचे पालखी प्रमुख रघुनाथबुआ गोसावी यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण