पंढरपूरच्या दिशेने निघालेली पालखी आणि वारी ही आनंदाची अनुभूती असून टाळ मृदुंगाच्या गजराने ज्ञानोबा तुकोबांची पालखी विठुरायाच्या भेटीला निघते आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जण मनाने दिंडीत सहभागी झालेला असतो. पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंद विश्व असून पंढरीचा पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा चितसूर्य आहे आणि चैतन्याचा प्रसादिक स्त्रोत आहे, अशीच प्रत्येक वारकऱ्याची आणि महाराष्ट्रातील माणसाची भावना असते. ज्ञानोबा तुकोबा ही त्या विश्वाची ऊर्जा असून विठ्ठल भक्ती हे विश्वाचे आदितत्व आहे. जीवनाची नैतिकता हे त्याचे व्रत आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांशी जोडून आपले जीवन अधिकाधिक प्रामाणिक करणे हाच प्रत्येक वारकऱ्याचा संस्कार असतो.
जीवन जगताना माणसाला अक्षय्य सुखाची अपेक्षा असते, जे सुख कधीही क्षय होणार नाही अर्थात संपणार नाही ते सुख मिळावे यासाठी प्रत्येक जण विविध पद्धतीने आपले जीवन जगत असतो. मुळात अक्षय्य सुखाची अनुभूती हाच मानवी जीवनाचा कळस असून स्वभावता मानवी मन इंद्रिय आणि देह हे सुखाच्या दिशेने धावत असतात, संपूर्ण विश्वातून आपल्याला पाहणे आणि समभावाचे दर्शन घडवणे हाच प्रत्येक वारकऱ्याचा धर्म आहे. या धर्माची पताका घेऊन वारकरी दिंडीत सहभागी झाला आहे, प्रपंचाला किंवा जगण्यातल्या वास्तवाला सासर मानून सकलसंतांनी विठ्ठलाच्या ठाई पंढरपुरी माहेर अनुभवले. विठ्ठल हा सोयरा, सज्जन असून सकलांच्या म्हणजे जीवाच्या तत्त्वाच्या, भावाच्या, भक्तीच्याही विश्रांतीचे स्थान आहे आणि तोच आनंदाचा विसावा आहे, तोच प्रेम भावाचा मुक्काम आहे, अशीच प्रत्येक वारकऱ्यांची भावना असते, ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी निघालेला असतो त्या परब्रह्माला साठवत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे वारी आहे, भक्ती नीती आणि कृती यांचा समन्वय साधून पुरुषार्थ प्रधान परमार्थ घडणारी जीवनप्रणाली म्हणजे वारी होय, नीती जेव्हा कृतीत उतरते तेव्हाच वारकरी हे व्यक्तिमत्व उभ राहत, अशी शिकवण तुकोबाराय आपल्या अभंगातून देतात. वारकरी होणं म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो, यावर सांगतांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ममत्व सांडून समत्व येणे आणि चराचरातील जीव रुपात परमात्मा स्वरूपाचा प्रतिबोध अनुभवणं म्हणजे वारकरी होणं...
चराचरात ब्रह्म आहे असे समजणारा वारकरी प्रत्येक वारकऱ्यात पांडुरंगालाच पाहतो आणि त्याच्या ठाई नम्र होतो पंढरीच्या वारकरी एकमेकांच्या पाया पडतात तिथे लहान मोठा असा भेद पाहत नाही कारण तो नमस्कार त्या वारकऱ्यात वसलेल्या भगवत रुपाला अर्थात पांडुरंगाला असतो. वारीमध्ये मानापमान सांडून भगवंताशी सहजगत्या तद्रूप झालेले वारकरी आपला पाहायला मिळतात. ज्ञान, पांडित्य, निराभिमानी होऊन भगवदभाव जगविण्यासाठी आयुष्यात एकदा तरी वारकरी व्हायला हवं. हृदयात देवाचे ध्यान, मुखी नामसंकीर्तन आणि सर्वाभूती साष्टांग नमन हीच वारकऱ्यांची खरी लक्षणे. सर्वाठायी नम्र होऊन भगवदभाव अनुभवणे हीच वेदांताची शिकवण आहे, कठीण वेदांत अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे असल्यास हाच वेदांत कृतीत उतरवणं म्हणजे वारकरी होणं, इतका साधा आणि सोपा वेदांताचा अर्थ वारकरी संप्रदायात सांगितला जातो.
तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, भक्त, भागवत आणि सामान्य उपासक या भूमिकेतून त्या अनंताच्या आनंद रुपाचा शोध घेत वैश्विकतेची पताका खांद्यावर घेऊन सध्या पालखी निघाली आहे, सगुणासहित निर्गुण निर्गुणासहित अद्वैत अद्वैतासहित द्वैत, द्वैतासहित भक्ती, भक्तीसहित ज्ञान ज्ञानसहित प्रेम, ज्ञान आणि भक्ती सहित कर्म, कर्मासहित संन्यास आणि मुक्तीसहित पुन्हा भगवत सेवा तर सेवेतून उभा राहिलेला सदाचारी प्रपंच असे या पालखीचे रिंगण जेव्हा पूर्ण होते तेव्हा संत साहित्याचे ज्ञान दर्शन शब्ददर्शन, भावदर्शन आणि त्यातून उभे राहिलेले जीवनवादी विवेक दर्शन यांची अनुभूती घेत ही पालखी अखंड वाटचाल करु लागते आणि प्रत्येक वारकरी म्हणतो, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल.....