Rakshabandhan 2021 : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचं प्लानिंग करायला सुरुवात झाली आहे. परंतु, आजच्या रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट आहे.


रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 21 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु होणार आहे. तर 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येत आहे. 


रक्षाबंधन हा हिंदू सण आहे. जो भारताच्या विविध भागात साजरा केला जातो. मॉरिशस आणि नेपाळमध्ये देखील हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून रक्षाबंधन सण साजरा केला जात असून हा मुख्य हिंदू उत्सवांपैकी एक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्याची कामना करते. 


रक्षाबंधन 2021 : राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त 


शुभ वेळ : 22 ऑगस्ट, रविवारी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांपासून संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपर्यंत 
राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ उत्तम : दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपासून ते 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत 


उजव्या हातात बांधा रक्षेचा धागा 


लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी औक्षणाचं ताट सजवा. पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढा. भावाला पाटावर बसवून त्याचं औक्षण करा. त्याच्या उजव्या हातात राखी बांधून त्याला मिठाई भरवा. तसेच त्याच्याकडून रक्षा करण्याचं वचन घ्या. राखी बांधणं म्हणजे, वैदिक पद्धतीत याला मणीबंधनाचे प्रतिक म्हणतात. त्यानंतर भाऊ स्वइच्छेने बहिणीला भेटवस्तू देतो.