Pod Taxi Service in Bandra-Kurla Complex: मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai News) आनंदाची बातमी. मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता आणखी एक सेवा सुरू होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla Complex) म्हणजेच, बीकेसीमध्ये आता पॉड टॅक्सी (Pod Taxi Service) म्हणजेच, मिनी टॅक्सी (MINI Taxi) धावणार आहेत. मंगळवारी झालेल्या एमएमआरडीएच्या (Mumbai Metropolitan Region Development Authority) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यासाठी एक हजार 16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीकेसी (BKC) भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान ही पॉड टॅक्सी धावणार आहे.


वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे, मुंबईतील नावाजलेला आणि गजबजलेला बिझनेस हब. या भागात अनेक ऑफिसेस आहेत. दररोज या भागात येणाऱ्या लोकांची वाहतूक सुलभ करण्यासाठी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं मंगळवारी केली. मुख्यमंत्री कार्यालयानं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकही जारी केलं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यानच्या 8.8 किमी लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सी सेवेला मान्यता दिली आहे.


सहा प्रवासी क्षमता असलेली पॉड टॅक्सी ताशी 40 किलोमीटर वेगानं धावेल आणि वाटेत 38 थांबे असतील, असे मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे आणि दोन रेल्वे स्थानकांपासून बीकेसीपर्यंतचा प्रवास सुलभ करेल.


लाखो लोक दररोज करतातील प्रवास


मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजबजलेल्या वांद्रे-कुर्ला मार्गावरील पॉड टॅक्सी प्रकल्पाची किंमत 1016 कोटी रुपये अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, प्रगत रॅपिड ट्रान्झिट सिस्टम तयार करण्यासाठी तीन वर्ष लागतील. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गावरील पॉड टॅक्सींसाठी निविदा काढण्यास मान्यता दिली आहे. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, दररोज 4 लाखांहून अधिक प्रवासी बीकेसीमध्ये प्रवास करतात आणि अहवालानुसार 2031 पर्यंत 1.9 लाख लोक पॉड टॅक्सी सेवेचा वापर करतील अशी अपेक्षा आहे.


पॉड टॅक्सी म्हणजे काय?


पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट (PRT) किंवा पॉड टॅक्सी ही एक टेक्निकल कार आहे, जी उर्जेच्या मदतीनं चालते. ही पूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी असणार आहे, ज्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही. विशेषतः ही पॉड टॅक्सी डिझाइन केलेल्या मार्गदर्शकांच्या नेटवर्कवर चालते. पॉड टॅक्सीद्वारे एकावेळी 3 ते 6 प्रवासी ये-जा करू शकतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पॉड टॅक्सी अधिक चांगल्या आहेत, कारण त्यांच्या वापरामुळे वाहनांमुळे होणारं वाढतं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यास मदत होते.