Navratri 2024 Travel: 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला (Navratri 2024) सुरूवात होतेय. देवाच्या आगमनासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे, अशात अनेकजण नवरात्रीच्या काळात देवीच्या शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी जातात. हिंदू धर्मात शक्तीपीठ अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी देवीची पूजा केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची धारणा आहे. देवीची शक्तीपीठं ही आध्यात्मिक उर्जेची केंद्रे मानली जातात. येथे ध्यान केल्याने मन शांत होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते. शक्तीपीठांच्या उत्पत्तीशी संबंधित अनेक कथा आहेत, परंतु सर्वात प्रसिद्ध कथा भगवान शिव आणि देवी सतीशी संबंधित आहे. आज आपण देवीच्या अशा शक्तीपीठाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात
जिथे जिथे सतीचे अवयव पडले, तिथेच बनले शक्तीपीठ!
हिंदू धर्मात शक्तीपीठांना देवी आदिशक्तीचे पवित्र स्थान म्हटले जाते, जेथे देवी सतीच्या शरीराचे विविध अवयव पडले होते. त्या ठिकाणी देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा दक्ष प्रजापतीने केलेला भगवान शिवाचा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात आत्मदहन केले. क्रोधित होऊन शिवाने दक्षाचा यज्ञ उध्वस्त केला आणि सतीचा मृतदेह घेऊन ब्रह्मांडात फिरू लागले. शिवाच्या विलापावर भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे अवयव तोडले. जिथे जिथे सतीचे अवयव पडले तिथे तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली. भारतात 51 प्रमुख शक्तीपीठे मानली जातात. देवी सतीचे शिर कोणत्या ठिकाणी पडले होते, सविस्तर जाणून घेऊया.
...म्हणून कपालेश्वरी मंदिर ओळखले जाते
कांगड्याच्या धौलाधर डोंगरावर वसलेल्या कुणाल पाथरी येथे सती देवीचे शिर पडल्याचे सांगितले जाते. जे आज कपालेश्वरी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात येणाऱ्या व्यक्तीला दर्शन आणि पूजा होते, अशी या मंदिराची श्रद्धा आहे. इथल्या दर्शनाने सर्व आजारांपासून आराम मिळतो. याशिवाय जीवनात येणारे अडथळेही दूर होतात. असे म्हटले जाते की, जर तुमची काही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही या मंदिरात देवीची यथायोग्य पूजा केली पाहिजे.
मंदिराचे महत्त्व काय?
धार्मिक मान्यतेनुसार, देवी कुणाल पाथरी मंदिरात देवीच्या डोक्यावरचा दगड नेहमी पाण्याने भरलेला असतो. या दगडावर जेंव्हा पाणी आटते तेंव्हा येथे पाऊस पडतो, अशी श्रद्धा आहे. इथे कधीच पाण्याची कमतरता भासत नाही. दगडातील पाणी प्रसाद म्हणून वाटले जाते. असे म्हणतात की हे पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग दूर होतात.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: संकटांपासून मुक्ती देणारं देवीचं अनोखं 'संकट मंदिर! काय आहे देवीची महती? भाविकांची श्रद्धा काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )