Monsoon Travel : रिमझिम पाऊस...सोबतीला हिरवागार निसर्ग...रस्त्यात दिसणारे छोटे-मोठे धबधबे..आणि ओठांवर पावसाची गाणी! अशा वातावरणात एन्जॉय करणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. पावसाळ्यात अवघ्या महाराष्ट्रातील निसर्ग फुलला आहे. अशात व्यस्त कामातून स्वत:साठी वेळ काढून अनेकजण आपल्या कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रमंडळींसोबत मान्सून पिकनिकसाठी फिरायला जातात. पावसाळ्यात कुठेतरी बाहेर जायचा विचार केला तर, नेहमी लोणावळा. खंडाळा ही ठिकाणं सांगितली जातात. मात्र सध्या लोकांची गर्दी, ट्राफिक पाहता या ठिकाणी जाणं धोक्यापेक्षा कमी नाही, तर अनेकांना कामानिमित्त जास्त दूरही जाता येत नाही. पण चिंता करू नका..आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातीलच अशा काही वेगळ्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्ही टेन्शन अगदी विसरून जाल, निसर्गाच्या सानिध्यात रिलॅक्स व्हाल..
जुलै ते सप्टेंबर पर्यंत कधीही प्लॅन करू शकता...
पावसाळा हा एक असा ऋतू आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी लाँग ड्राईव्हवर जावेसे वाटते किंवा वीकेंडला मित्रांसोबत फिरायला जावेसे वाटते, परंतु काहीवेळा पावसाळ्यात सहलीचे नियोजन करणे अडचणीचे ठरते. या ऋतूत योग्य डेस्टीनेशन निवडणे खूप महत्वाचे आहे. महाराष्ट्रात लोणावळा, खंडाळाशिवाय अशी अनेक ठिकाणे इथे आहेत, ती निसर्गसुख अनुभवण्याची खरी मजा पावसाळ्यातच येते. पावसाळ्यात महाराष्ट्रातील सौंदर्य पाहण्यासारखे असते. या यादीत लोणावळा आणि खंडाळा व्यतिरिक्त विविध ठिकाणांचा समावेश आहे. तुम्ही येथे जुलै ते सप्टेंबर पर्यंत कधीही प्लॅन करू शकता.
अलिबाग
अलिबाग हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर ठिकाण आहे. इथे केव्हाही येण्याचा प्लॅनिंग तुम्ही करू शकता, पण पावसाळ्यात इथे येण्याचे प्लॅनिंग सर्वोत्तम मानले जाते. पावसाळ्यात इथले स्वच्छ किनारे आणखीनच प्रेक्षणीय दिसतात. येथून रेवदंडा, जंजिरा, अलिबाग किल्ल्यावर जाता येते. नागाव आणि अलिबाग समुद्रकिना-यावर अनवाणी चालायला मजा येते. वेळ मिळाल्यास जवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यालाही भेट द्या.
माळशेज घाट
महाराष्ट्रात पावसाळ्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी माळशेज घाटात पाहायला मिळते. पावसाची रिमझिम होताच घाटावर हिरवाईची चादर पसरते. हे पाहून डोळ्यांना एक वेगळाच दिलासा मिळतो. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे सौंदर्य प्रत्यक्ष पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. माळशेज धबधबा, कोकण कडा, पिंपळगाव जोगा धरण, आजोबागड किल्ला ही इथली काही उत्तम ठिकाणे आहेत.
इगतपुरी
इगतपुरी हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही कुटुंब, मित्रांसोबत किंवा एकटे सुद्धा वेळ घालवू शकता. वीकेंडला इथे वेगळीच गर्दी पाहायला मिळते. छोटे-मोठे धबधबे बघून त्यात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्रिंगलवाडी किल्ला, विहिगन धबधबा, भावली धरण चुकवू नका.
माथेरान
महाराष्ट्रात माथेरानला येऊनही तुम्ही पावसाळ्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. माथेरान हे महाराष्ट्रातील एक लहान पण अतिशय लोकप्रिय हिल स्टेशन आहे. लुईसा पॉइंट हे येथील मुख्य आकर्षण आहे. ज्यासाठी तुम्हाला काही किलोमीटरचा ट्रेक करावा लागेल. याशिवाय शार्लोट लेक, मंकी पॉइंट, यासारखी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात 'या' 5 रेल्वे मार्गांवर प्रवास कराच..! हा अनुभव स्वर्गसुखापेक्षा कमी ठरणार नाही
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )