Makar Sankranti 2021 : जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत. या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगण्यात येतं. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही. तो का साजरा करतात? कसा साजरा करतात? या बद्दलही फारच कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया भोगी सणाबद्दल...


मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी हा सण साजरा केला जातो.


...म्हणून भोगी साजरी करतात


भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असतात.


भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते. भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. थंडीतील विशेषत: नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते.


मकरसंक्रांतीचं महत्त्व :


मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारी येणार पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते.