Coronavirus India आतापर्यंत देशामध्ये कोरोनाचे तब्बल 1 कोटी 4 लाख 79 हजार 179 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 385 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं देशात आता कोरोना रुग्णसंख्येचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावताना दिसत आहे.
Coronavirus India दर दिवशी देशात नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाल्याची बाब स्पष्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 12 हजार 584 नवे कोरोनाबाधित आढळून आले.


इथं मुख्य बाब अशी की, जून 2020 नंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकानं घट होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळं ही दिलासादायक बाब ठरली आहे. मागील 24 तासांच देशात कोरोनामुळं 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळं आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गानं दगावणाऱ्यांचा आकडा 1 लाख 51 हजार 327वर पोहोचला आहे.


मागील 18 दिवसांपासून देशात 300हून कमी मृत्यू


गेल्या 18 दिवसांचा आढावा घेतला असता, देशभरात 300 हून कमी रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर येत आहे. ज्यामुळं कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 96.43 वर पोहोचला आहे. तर, मृत्यूदर 1.44 टक्क्यांवर आहे.





देशात कोरोना लसीकरणाची तयारी शेवटच्या टप्प्यात


दरम्यान, कोरोनावर भारतीयांनी बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवलं असल्याचं पाहायला मिळत असतानाच आता देश कोरोना लसीकरणाच्या दृष्टीनंही सज्ज होत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्राकडून देशात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली. त्याच धर्तीवर, मंगळवारी, सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.