मुंबई : कोरोना व्हायरसशी लढताना सरकारसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. कारण 80 टक्के प्रकरणांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणंच दिसत नाहीत. मागील काही दिवसांची राज्यातील आकडेवारी स्पष्ट करतेय की Asymptomatic म्हणजेच लक्षणविरहीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या सायलेंट कॅरियरच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो आहे.


कालपर्यंत (20 एप्रिल) 2336 रुग्णांपैकी 1890 म्हणजेच तब्बल 81 टक्के रुग्ण Asymptomatic आढळून आले आहेत. तर 19 एप्रिलपर्यंत 82 टक्के, 18 आणि 17 एप्रिलपर्यंत प्रत्येकी 79 टक्के आणि 16 एप्रिलपर्यंत 80 टक्के Asymptomatic आढळून आले आहेत. याचाच अर्थ कोरोना झालेली व्यक्ती धडधाकट दिसत असली तरी ती सायलेंट कॅरियर म्हणून इतरांना संक्रमित करु शकते. यामध्ये लहान बालकं, वयोवृद्ध किंवा विविध आजारांनी त्रस्त असलेल्यांसाठी हे अतिशय धोकादायक ठरु शकते.


अशा परिस्थितीत असिम्पटोमॅटिक रुग्णांची तपासणी न करणं यामुळे पुढील दिवसात आकड्यांमध्ये घट दिसू शकते, मात्र संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती विरोधी पक्ष नेत्यांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा एपी सेंटर ठरलेल्या मुंबईत कोविड 19 च्या तपासणीच्या निकषात मुंबई महापालिकेने केलेल्या बदलांबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारांच्या पुढे
राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सोमवारी (20 एप्रिल) 466 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4666 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 जण कोरोनाबाधित आहेत. राज्यात काल दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील सात मुंबईतील तर दोनजण हे मालेगाव येथील आहेत. दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.


Coronavirus Update | 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाहीत!