Lifestyle : रेल्वेत नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून तो परीक्षेत पास होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत होता. पण काळाचा घाला असा आला की, हे स्वप्न आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली. रात्रीच्या जेवणात (2 Minute Noodles) नूडल्स खाल्ल्यानंतर एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृत पावलेल्या तरुणाला अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



रात्रीच्या जेवणात खाल्ले नूडल्स अन् काळाचा घाला असा आला की...



मध्यप्रदेशातील राघोगड, ड्रीम सिटी कॉलनीत राहणाऱ्या हेमंत मोगिया 25 वर्षीय तरुणाचा शुक्रवारी संशयास्पद मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या जेवणात नूडल्स खाऊन तरुण झोपला. त्यानंतर या तरुणाला उलट्या आणि चक्कर येऊ लागली. यावर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराचा झटका हे संभाव्य कारण असल्याचे म्हटले आहे. तसेच यातून अन्नातून विषबाधा होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमंतच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू आहे. 



रेल्वेत नोकरीचं स्वप्न भंगलं..!


तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, हेमंत रेल्वेत भरतीची तयारी करत होता. त्याचा धाकटा भाऊ अरविंद, वय 21, हा देखील शिक्षण घेत आहे. तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, रात्री अडीचच्या सुमारास हेमंतला अचानक उलट्या होऊ लागल्या आणि चक्कर आल्याची तक्रार केली. त्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला आणि त्याला प्रथम राघोगड येथील सदा कॉलनी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात आणले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, घरातील सर्वांनी रात्री जेवणासोबत मॅगी खाल्ली होती. तरुण आणि त्याचे नातेवाईक हे मूळचे जामनेरजवळील पाचगोडिया गावचे रहिवासी आहेत.


 


तरुणाच्या मृत्यूचे नेमकं कारण काय? डॉक्टर म्हणाले...


मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणारे डॉक्टर राहुल रघुवंशी यांनी सांगितले की, या घटनेच्या प्राथमिक तपासात तरुणाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असण्याची शक्यता आहे. मात्र, व्हिसेरा तपासासाठी पाठवण्यात आला आहे. संपूर्ण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्याचबरोबर अन्नातून विषबाधा, सतत उलट्या आणि जुलाबामुळेही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, असे डॉक्टरांनी सांगितले


 


हेही वाचा>>>


Mental Health : कामाचा ताण, शिफ्टमुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतोय परिणाम? एकटेपणा वाढतोय? समस्येवर मात कशी कराल?


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )