World Happiness Index : संयुक्त राष्ट्र वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये सलग सहाव्यांदा फिनलँड देशाने जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अव्वल स्थान मिळवले. वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये उत्पन्न, आरोग्य आणि आयुष्यातील घडामोडींबाबत निर्णय घेण्याची क्षमता आदी निकषांच्या आधारे ही क्रमवारी निश्चित करण्यात येते. एकूण 137 देशांच्या यादीत भारत 125 व्या स्थानावर आहे. 


मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अहवालात भारताचा क्रमांक चांगला आहे. 2022 मध्ये भारताचा क्रमांक 136 होता. पण भारत अजूनही नेपाळ, चीन, बांगलादेश इत्यादी शेजारी देशांच्या खाली आहे.


जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही भारत 124 देशांच्या मागे आहे. वर्षभराहून अधिक काळ युद्धाला सामोरे जाणारा युक्रेन आणि गंभीर आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान आणि इजिप्त सारखे देश भारतापेक्षा अधिक सुखी आहेत. अशा परिस्थितीत भारत संकटात सापडलेल्या देशांच्या तुलनेत मागे कसा राहील, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स कसा मोजतात, कोणत्या निकषांवर मोजतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. 


निकष काय?


वर्ल्ड हॅपनिसे इंडेक्समधील क्रमवारी निश्चित करताना संयुक्त राष्ट्र काही प्रमुख घटकांचा निकष लागू होतो. यामध्ये उत्पन्न, निरोगी आरोग्य, सामाजिक सहकार्य, स्वातंत्र्य, विश्वास आणि औदार्य या घटकांचा मुख्यत: विचार करण्यात येतो.


वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार करताना, सरासरी आयुष्य हे मूल्यांकनासाठी महत्त्वाचे घटक मानले गेले असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामध्ये COVID-19 च्या तीन वर्षांच्या (2020-2022) सरासरीचा देखील समावेश आहे. यावर्षी अहवाल तयार करताना, कोविड-19 चा लोककल्याणावर कसा परिणाम झाला आहे याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. लोकांमध्ये परोपकार वाढला किंवा कमी झाला. विश्वास, परोपकार आणि लोकांमधील सामाजिक संबंध हे देखील प्रमुख मापदंड म्हणून वापरले गेले आहेत. 


गॅलप वर्ल्ड पोल सारख्या स्त्रोतांकडून मिळालेल्या डेटावर आधारित, नॉर्डिक देशांना अहवालात अग्रस्थान देण्यात आले आहेत. या अहवालात फिनलंड हा सलग सहाव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, इस्रायल आणि नेदरलँडचा क्रमांक लागतो. अहवालानुसार भारताजा शेजारी देश पाकिस्तानचा क्रमांक 103 व्या स्थानावर आहे. त्याच वेळी, रशिया 70 व्या स्थानावर आहे आणि युक्रेन 92 व्या स्थानावर आहे.


नॉर्डिक देशांमधील वैयक्तिक आणि संस्थात्मक विश्वास लक्षात घेण्यासारखा आहे. कोरोना महासाथीच्या आजारात पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत नॉर्डिक देशांमध्ये कमी मृत्यूची नोंद झाली असल्याकडे अहवालात नोंद करण्यात आली आहे. 


कोरोना महासाथीमध्ये पश्चिम युरोपीयन देशांमध्ये प्रति एक लाख लोकांमागे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, नॉर्डिक देशामध्ये हेच प्रमाण 27 इतके होते. 


रशिया आणि युक्रेन भारतापेक्षा आनंदी कसे?


मागील एक वर्षांहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.  वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये रशिया 70 व्या आणि युक्रेन 92 व्या स्थानी आहे. वर्ष 2020 आणि 2021 मध्ये परोपकारात दोन्ही देशांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले. वर्ष 2022 मध्ये युक्रेनमध्ये यात मोठी वाढ झाली. 


फिनलँड हा सर्वात आनंदी देशांमध्ये अव्वल स्थानी; अफगाणिस्तान शेवटच्या स्थानी


10 पैकी 7.8 गुणांसह फिनलँडने सलग सहाव्या वर्षी आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. डेन्मार्क, आइसलँड हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या 10 देशांमध्ये इस्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि न्यूझीलंड या देशांनी स्थान मिळवले आहे.  इस्रायल गेल्या वर्षी नवव्या क्रमांकावर होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: