नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळेस धमकीचा फोन आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या फोन कॉलनंतर तपास चक्र वेगाने फिरत आहे. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार तीन वेळेला आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे मंगळुरू कनेक्शन समोर आले आहे.  नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याप्रकरणी मंगळुरुमधून एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलिसांची (Nagpur News)  एक टीम तातडीनं बेळगावला रवाना झाली आहे.


नागपूर पोलिसांनी एबीपीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीप्रमाणे मंगळूरू येथील रजिया नावाच्या तरुणीला  ताब्यात घेण्यात आले आहे.  गडकरी यांच्या कार्यालयाला धमकी देण्यापूर्वी आम्ही तुझा नंबर एका कामासाठी देत असल्याचे फोन करून सांगितले. रजियाला फोन करून सांगणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव जयेश पुजारी असेच सांगितले होते. त्यामुळे गडकरी यांच्या कार्यालयाला बेळगाव तुरुंगातून धमकी दिल्याच्या प्रकरणात आता मंगळुरू कनेक्शनही समोर येत आहे.


 दरम्यान, गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन आणि रजियाला करण्यात आलेला फोन हे दोन्ही फोन कॉल बेळगावच्या तुरुंगामधूनच झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या रजिया नावाची ती तरुणी मंगळुरुच्या रुग्णालयात दाखल आहे.. स्थानिक पोलीस सध्या चौकशी करत आहे. दरम्यान   अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणे आणि धमकी देणे  गुन्हा दाखल केला आहे. नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले आहे. नागपूर पोलीस या प्रकरणी कर्नाटक प्रशासनासोबत संपर्कात आहे. 


गडकरी यांच्या कार्यालयात मंगळवारी लागोपाठ तीन कॉल


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गडकरी यांच्या कार्यालयात मंगळवारी लागोपाठ तीन कॉल आले. 10:55 वाजता आलेल्या पहिल्या कॉलमध्ये बोलणे झाले नाही. मात्र 11 आणि 11:55 वाजता आलेल्या पुढील दोन कॉलमध्ये धमकी देणाऱ्याने  जयेश पुजारी बोलत असल्याचे म्हटले आणि दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसेच याची वाच्यता पोलिसांकडे करू नये असा इशाराही दिला.  जयेश पुजारी सध्या बेळगाव जेलमध्येच आहे. मात्र, आज धमकी देणारा तो जयेश पुजारी आहे की कोणी खोडसाळपणा करत आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


नितीन गडकरींच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन;  जयेश पुजारीच्या नावानं गडकरींना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू