Kitchen Tips : हिवाळ्याचे (Winter) दिवस हळूहळू सुरु व्हायला लागले आहेत. या थंडीच्या दिवसांत सूप (Soup) पिण्याची खरी मजा येते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांपासून बनवलेले सूप आरोग्यासाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर असते. ज्या लोकांना हिरव्या भाज्या खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी व्हेजिटेबल सूप हा एक चांगला पर्याय आहे. सूपमध्ये भाज्या मिक्सरमधून एकदम बारीक केल्या जातात, त्यामुळे तुम्ही अशा पदार्थांमध्ये मसालेदार पदार्थांचा समावेश करू शकता. आज आपण अशाच एका सूपबद्दल जाणून घेणार आहोत, जे खूप आरोग्यदायी आहे. लाल शिमला मिरची ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या ठिकाणी आपण लाल शिमला मिरची आणि रताळ्याचा वापर करून तयार केलेले सूप पिऊ शकता.
सिमला मिरची-रताळे सूप रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य - 1 मध्यम आकाराची लाल शिमला मिरची बारीक चिरलेली, 100 ग्रॅम रताळे चिरून, 1 कांदा जाड चिरलेला, एक चमचा काळी मिरी, 1 चमचा ताजी चिरलेली कोथिंबीर, 2 लसनाच्या पाकळ्या, 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ, तसेच पाणी.
सूप बनवण्याची पद्धत
1. कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि लसूण घालून परतून घ्या.
2. थोडे परतून झाल्यावर त्यात चिरलेली शिमला मिरची आणि रताळे टाकून हलके परतून घ्या. थोडे शिजल्यावर त्यात पाणी घालून 5 मिनिटे उकळा.
3. पाच मिनिटांनी गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. यानंतर हे मिश्रण मिठ आणि काळी मिरी सोबत मिक्सरमध्ये टाका. सर्व साहित्य बारीक करून बारीक पेस्ट बनवा.
4. यानंतर, हे मिश्रण गाळून घ्या आणि पुन्हा पॅनमध्ये ठेवा आणि त्याला थोडं शिजू द्या. यामध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही अधिक पाणी घालू शकता. सूपाला चांगली उकळी आल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर घालून सूपाला छान सजवा.
लाल सिमला मिरची आणि रताळ्यापासून बनवलेले हे सूप अ आणि क जीवनसत्त्वांचा खजिना आहे आणि त्यात फायबरही चांगले असते. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते, आपल्याला लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :