मुंबई : एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू असून, आजचा सहावा दिवस आहे. तर, दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी आजपासून संपाची हाक दिली आहे. त्यामुळे, राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur), नाशिकसह (Nashik) सर्वच जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच जोरदार निदर्शने करत संपाची सुरवात केली आहे. 


नाशिक जिल्ह्यात देखील संपाचे पडसाद...


राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी यात सहभागी होणार असल्याने राज्यात आरोग्य सेवा देखील विस्कळीत होण्याची भिती व्यक्त केली जाते आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,  स्त्री रुग्णालय, विभागीय संदर्भ रुग्णालयातील परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारत संपात सहभागी झाले आहेत. 


छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात निदर्शने 


शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला नसल्याने जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्व शासकीय कर्मचारी आजपासून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. त्यामुळे शासकीय सेवेवर, खास करून रुग्णसेवेवर याचा परिणाम होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील सर्व शासकीय कर्मचारी संपावर असल्याने रुग्णसेवेवर त्याचा निश्चित परिणाम होईल. रुग्णसेवर जास्तीचा परिणाम होऊ नये म्हणून, विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी सेवा देण्याबाबत प्रशासनाच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत. तर, शासकीय घाटी रुग्णालयाच्या परिसरात शासकीय कर्मचारी यांच्याकडून जोरदार निदर्शने देखील करण्यात आले. 


कोल्हापुरात शासकीय कर्मचारी संपावर...


जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आग्रही असून, आजपासून संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आज रात्री बारा वाजल्यापासून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील व शासकीय मुद्रणालय मधील कर्मचारी संपावर गेले आहेत. नागपूरमध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने काम बंदची हाक देत संपावर जाण्याचा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. तर, संप काळात रुग्णालयात गंभीर रुग्ण आल्यावर रुग्णाची गैरसोय होणार नाही यासाठी हजर राहू, असेही संपकरी डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत. 


मुंबईच्या जेजे रुग्णालयात निदर्शने...


जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. याचा फटका मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला आज सकाळपासून बसतांना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयात कर्मचारी संपावर गेले आहेत, या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात निदर्शने करीत जुन्या पेन्शनची मागणी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Old Pension Scheme : विधानसभेत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा तापणार, राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर